भारताची सुपरमॉम : ऑफिसबाहेर ताटकळत ठेवणारा नव्हे, जवळ घेऊन धीर देणारा मंत्री

ट्विटरवरुन मदत करणे असो किंवा वैयक्तिक पातळीवर कोणत्याही समस्येचं निराकरण करणे असो, या गुणांनी त्यांनी जागतिक पातळीवर ओळख मिळवली होती. वॉशिंग्टन पोस्टने त्यांचा (Sushma Swaraj) ‘भारताची सुपरमॉम’ असा उल्लेख केला तो यामुळेच...

  • Updated On - 11:27 am, Wed, 7 August 19 Edited By: Team Veegam
भारताची सुपरमॉम : ऑफिसबाहेर ताटकळत ठेवणारा नव्हे, जवळ घेऊन धीर देणारा मंत्री

राज्याची कल्पना जनतेच्या कल्याणासाठी असल्याचं आपण प्राचिन काळापासून ऐकत आलो आहेत आणि निवडून दिलेला सरकार चालवणारा प्रतिनिधी हा जनतेचा सेवक असावा, ही त्यामागी विचारधारा आहे. पण मानवी मूल्य हेच तत्व जोपासणारा नेता आधुनिक भारताच्या काळात अत्यंत कमी वेळा पाहायला मिळाला. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यापैकीच एक होत्या. 21 व्या शतकातील डिजीटल क्रांतीचा जनकल्याणासाठी कसा फायदा करता येऊ शकतो, याचं एक उदाहरण सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांनी फक्त भारतातच नव्हे, तर जगासमोर ठेवलं होतं. त्यांची ट्विटरवरुन मदत करणे असो किंवा वैयक्तिक पातळीवर कोणत्याही समस्येचं निराकरण करणे असो, या गुणांनी त्यांनी जागतिक पातळीवर ओळख मिळवली होती. वॉशिंग्टन पोस्टने त्यांचा (Sushma Swaraj) ‘भारताची सुपरमॉम’ असा उल्लेख केला तो यामुळेच… एखादा पीडित मदतीसाठी येतो तेव्हा त्याला कार्यालयाच्या बाहेर वाट पाहायला लावणाऱ्या मंत्र्यांपैकी सुषमा स्वराज कधीच नव्हत्या. परिस्थितीसमोर हतबल झालेल्या त्या पीडिताला जवळ घेऊन धीर देणं हाच गुण सुषमा स्वराज यांचा सर्वांपेक्षा वेगळं बनवतो. मुंबईतील एक तरुण प्रेम प्रकरणातून पाकिस्तानमध्ये गेला आणि त्याला तिथे अटक झाली. या तरुणाच्या कुटुंबीयांना जवळ घेऊन सुषमा स्वराज यांनी जो धीर दिला, तो फोटो पाहून अनेकांना आपल्याला असा मंत्री मिळाल्याचं समाधान होतं.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हे प्रकरण वैयक्तिकपणे मनावर घेत त्यांनी पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला 16 वेळा कौन्सिलर एक्सेस देण्याची मागणी केली. या सर्वांचा कहीही फायदा न झाल्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेण्याचा त्यांचा निर्णयही तेवढाच योग्य ठरला. सुषमा स्वराज या प्रकरणात अत्यंत भावनिकदृष्ट्या गुंतलेल्या होत्या असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यांनी कुलभूषण जाधव यांच्यासोबत त्यांची आई आणि पत्नीचीही भेट घालून दिली. या कुटुंबाने नुकतीच सुषमा स्वराज यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूसही केली होती.

सुषमा स्वराज यांच्या त्यांच्या मंत्रालयाचे विविध देशात 165 पेक्षा जास्त ट्विटर हँडल सुरु केले होते. पण प्रत्येक जण थेट सुषमा स्वराज यांच्याकडूनच मदत मागायचा. कारण, त्याला हमखाल मदतीची अपेक्षा होती. सुषमा स्वराज यांचा सक्रियपणा दाखवणारं एक उदाहरण पुरेसं आहे. फैजान पटेल नावाच्या व्यक्तीने ट्वीट केलं, “मी हनीमूनला एकटा चाललोय, कारण माझ्या पत्नीचा पासपोर्ट झाला नाही” सुषमा स्वराज यांनी विलंब न करता या व्यक्तीच्या पत्नीला आपल्याला फोन करायला सांगितलं आणि पत्नी तुमच्या बाजूच्या सीटवर असेल, अशी शाश्वतीही दिली. सौदी अरेबिया, यमन, युक्रेन, दक्षिण सुदान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय कामगारांची सुषमा स्वराज यांनी ज्या प्रकारे मदत केली, ती कदाचित दुसरं कुणीही करु शकलं नसतं. कारण, सुषमा स्वराज यांचं प्रत्येक भारतीयाशी भावनिक नातं होतं. उजमा अहमद या तरुणीची पाकिस्तानमधून सुटका करण्यातही सुषमा स्वराज यांनी अत्यंत वैयक्तिक पातळीवर लक्ष दिलं आणि कायदेशीर लढाई लढत या तरुणीची सुटका केली.

सुदैवाने भारतीय राजकारणाला पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून अत्यंत उत्तम परराष्ट्र धोरणाचा वारसा लाभलेला आहे. पण देशांतर्गत राजकीय अस्थिरतेने याकडे अनेकदा दुर्लक्ष झालं. 2014 मध्ये देशाला स्थिर सरकार मिळाल्यानंतर परराष्ट्र धोरणात एका नव्या अध्यायाची सुरुवात केली ती सुषमा स्वराज यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा जगभरात प्रसिद्धी मिळालेला जागतिक नेता आणि ती प्रतिमा याचा त्यांनी भारतासाठी अत्यंत कौशल्याने वापर केला. विशेषतः त्यांनी जी मानवी मूल्य जोपासली, त्याचं पाकिस्तानसारख्या कट्टर शत्रू असलेल्या देशातूनही कौतुक झालं. पुलवामासारखा भ्याड हल्ला झाल्यानंतर दोन्ही देशातले संबंध कमालीचे ताणले होते. पण या प्रसंगातही त्यांनी मानवी मूल्य जोपासली आणि हा गांधीजींचा देश आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. पाकिस्तानमधून भारतात उपचार करण्यासाठी येणारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही देशात संबंध कमालीचे ताणलेले असतानाही सुषमा स्वराज यांनी कधी मेडिकल व्हिजा देण्यासाठी विचार केला नाही. अनेक गरीब देशातील रुग्णांची सुषमा स्वराज यांनी मदत केली.

भारतीय समुदाय जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याही अडचणी असतात आणि त्या आपला मूळ देश भारतानेच ऐकायला हव्यात हे साधा नियम आहे. सुषमा स्वराज यांनी या भारतीय समुदायाला प्रचंड जवळ आणलं. कुणी अडचणीत असेल तर त्याला फक्त एका ट्वीटवर मदत मिळणे हा भारतीय राजकारणात एक नवा आणि अनपेक्षित अनुभव होता. पासपोर्ट मिळवण्याच्या प्रक्रिकेयतील क्रांती असो किंवा विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याचं स्वप्न असो, एक-एक गोष्ट निवडून सुषमा स्वराज यांनी त्यावर काम केलं. अमेरिकेने एच वन व्हिजाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारताची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या सुषमा स्वराजच होत्या, ज्यामुळे भारताचा कोटा जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न झाला.

सुषमा स्वराज या फक्त लोकांना मदत केल्यामुळेच ओळखल्या गेल्या नाही. त्यांनी भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मोठ्या प्रमाणात सुधारली. 29 सप्टेंबर 2018 रोजी केलेलं संयुक्त राष्ट्राच्या 73 व्या जनरल असेम्बलीतील भाषण लक्षात असेल तर, भारत काय होता आणि आजचा भारत काय आहे हे जगासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडलं. त्याचवेळी पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचं कामही त्यांनी अत्यंत चातुर्याने केलं. भारताने कशा पद्धतीने लाखो लोकांना दारिद्र्यातून बाहेर आणलंयय आणि संयुक्त राष्ट्राने ठरवलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयाच्या पूर्तीकडे भारत यशश्वीपणे वाटचाल करत आहे, हे त्यांनी जगासमोर सांगितलं. त्यांच्या या भाषणाने भारतातूनच नव्हे, तर जगभरातील भारतीय समुदायाकडून कौतुक मिळवलं होतं.

सुषमा स्वराज यांचं जाणं आजही अनेकांसाठी धक्कादायक आहे. पण त्यांचं काम आणि लोकांनी त्यांना दिलेले आशीर्वाद यामुळे त्या कायम जीवंत राहतील. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी जो नवा अध्याय लिहिला, त्याला इतिहासामध्ये महत्त्वाचं स्थान मिळेल.

(नोट : ब्लॉगमधील लेखकाची मते ही वैयक्तीक मते आहेत)