कोरोना गांभीर्यानं घ्या, राज्यात 5 लाख लग्न, उपमुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन, पारनेरमधील कार्यक्रमात वक्तव्य

पिंपळनेर येथील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन केले. येत्या काळातील लग्नसराईच्या दृष्टीने खबरदारी बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कोरोना गांभीर्यानं घ्या, राज्यात 5 लाख लग्न, उपमुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन, पारनेरमधील कार्यक्रमात वक्तव्य
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 21, 2021 | 4:47 PM

अहमदनगरः पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर (Pimpalner) येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, लोकांना कार्यक्रमाला जमायला आवडतं. पण सर्वांनी लस टोचून घ्या. बाहेरच्या देशात कोरोनाची लाट येतेय. सध्या देशात 25 लाख लग्न येत्या काळात होणार आहेत. त्यातले 5 लाख लग्न महाराष्ट्रात होणार आहेत. त्यामुळे कोरोनाला गांभीर्यानं घ्या, आजही 10 टक्के लोकांनीही मास्क घातले नाहीत. गृहमंत्र्यांनाही दोन वेळा कोरोना झालाय. कोरोना मंत्री आहे हे पाहत नाही.

मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत आहे. या योजनेचे बिल नियमितपणे भरावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळनेर येथे बोलताना केले. या कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार निलेश लंके, चैतन्य महाराज देगलूरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

मंदिराच्या विकासकामांसाठी 50 लाख रुपयांचा निधी- अजित पवार

पारनेर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेसंबधी सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना पवार यांनी यावेळी संबंधिताना केली. श्री क्षेत्र पिंपळनेरला प्रतीपंढरपूर म्हणून नावलौकिक मिळाला आहे. संत निळोबाराय मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘शेतकऱ्यांना हिणवले गेले, पण अखेर झुकावं लागलं’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक तीन महत्त्वाचे कायदे नुकतेच मागे घेतल्याची घोषणा केली. हा शेतकरी आंदोलनाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. लोकांच्या इच्छेसमोर सरकारला झुकावं लागतं, हे आपण काल पाहिलं. मात्र यासाठी वर्षभरात अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांना हिणवलं गेलं. त्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी म्हटलं गेलं, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

एसटी संपः चर्चेतून मार्ग काढला पाहिजे

एसटी संपातदेखील काही जण भडकवण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप अजित पवार यांनी केला. आम्ही हटणार नाहीत, ही भूमिका योग्य नाही. सरकारनंही दोन पावलं मागे आलं पाहिजे तर आंदोलकांनीदेखील दोन पावलं मागे आलं पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

पिंपळनेर येथील या कार्यक्रमात आ. निलेश लंके यांनी प्रस्तावित योजनांची माहिती दिली. पारनेर परिसरातील विकास कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे सांगितले. श्री संत निळोबाराय अभंग गाथेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी संत निळोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या-

Farm Laws: शेतकरी संघटना उर्वरित प्रश्नांसाठी पंतप्रधानांना खुलं पत्र लिहिणार, 27 नोव्हेंबरला आंदोलनावर निर्णय

शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना ईडीची नोटीस, सोमय्यांचा दावा; अजित पवारांबद्दल मात्र यू टर्न


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें