विनोदी अभिनेता किकू शारदाविरोधात 50 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

द कपिल शर्मा शो अभिनेता किकू शारदासह पाच जणांनी ट्रस्टच्या माध्यमातून आपली 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका कला दिग्दर्शकाने केला आहे. मात्र किकूने आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत.

विनोदी अभिनेता किकू शारदाविरोधात 50 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ (Comedu Nights with Kapil) या कार्यक्रमात ‘पलक’च्या भूमिकेमुळे गाजलेला
विनोदी अभिनेता किकू शारदा (Kiku Sharda) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किकूसह पाच जणांनी
50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप कला दिग्दर्शकाने केला आहे.

कला दिग्दर्शक नितिन कुलकर्णी यांनी मुंबईतील अंबोली पोलिसात किकू शारदासह पाच जणांविरोधात फसवणुकीची
तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

द मुंबई फेस्ट (The Mumbai Fest) नावाच्या ट्रस्टच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप आहे. किकू शारदा या
ट्रस्टशी निगडीत असल्याने त्याचं नावही एफआयआरमध्ये आहे. तक्रारदार आणि आरोपी यांच्यात समन्वयाच्या अभावामुळे ही रक्कम शिल्लक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

किकू शारदाने मात्र आपल्यावरील आरोप नाकारत नितीन कुलकर्णींवरच उलट आरोप केले आहेत. ‘मी ‘द मुंबई फेस्ट’ या ट्रस्टचा सदस्य नाही. मी केवळ त्यांच्या इव्हेंट्समध्ये सहभागी झालो होतो. माझे वडील या ट्रस्टचे मेंबर आहेत. माझं नाव विनाकारण या प्रकरणात गोवलं जात आहे’ असा दावा किकूने केला आहे.

यापूर्वी राम रहीमची खिल्ली उडवल्याबद्दल किकू शारदाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. किकू शारदा सध्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये बच्चा यादव ही भूमिका साकारत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI