ईझियाओ म्हणजे काय? चीनच्या वेलनेस इंडस्ट्रीत अधिक मागणी का? वाचून थक्क व्हाल
गाढव मिळतोय लाखांच्या घरात? होय, पाकिस्तानमध्ये सध्या गाढवांना अक्षरशः 'सोन्याचा भाव' आलाय, आणि यामागचं कारण आहे चीन! पण चीनला या गाढवांची इतकी गरज का पडलीये, की त्यांच्या किमती आभाळाला भिडल्यात? चला, जाणून घेऊया या अजब व्यापारामागची खास गोष्ट!

गाढव सामान्यतः ग्रामीण भागात ओझं वाहणारा, शेतकऱ्यांचा मदतीचा प्राणी म्हणून ओळखला जाणारा आज पाकिस्तानमध्ये ‘सोन्याच्या भावात’ विकला जात आहे. विशेषतः चीनमधील वाढती मागणी लक्षात घेता, पाकिस्तानी गाढवांची किंमत अवघ्या काही वर्षांत २०-२५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये इतकी झाली आहे. यामागे कारण आहे चीनमध्ये तयार होणारं एक खास पारंपरिक औषध ‘ईझियाओ’ (Ejiao)
चीनमध्ये ‘ईझियाओ’ म्हणजे काय?
‘ईझियाओ’ हे पारंपरिक चिनी औषध हजारो वर्षांपासून वापरात आहे. यामध्ये गाढवाच्या कातडीपासून तयार होणाऱ्या जिलेटिनचा वापर केला जातो. हे जिलेटिन थकवा दूर करणं, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणं, हिमोग्लोबिनचं प्रमाण सुधारणं आणि वृद्धत्वाची प्रक्रिया धीमी करणं यासाठी प्रसिद्ध आहे. चीनमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, विशेषतः वृद्ध, महिलांमध्ये आणि सध्या तर ‘वेलनेस इंडस्ट्री’मध्ये याला मोठी मागणी आहे.
चिनी औषधासाठी गाढवांची कत्तल?
सध्या ज्या वेगाने चीनमध्ये ‘ईझियाओ’ ची मागणी वाढते आहे, त्या वेगाने गाढवांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर उपाययोजना करणे गरजेचं ठरत आहे.
पाकिस्तानमधील गाढवांची निर्यात केंद्रबिंदू
चीनमध्ये दरवर्षी लाखो गाढवांच्या कातड्या लागतात. भारताने यापूर्वी गाढवांच्या कत्तलीवर आणि कातडीच्या निर्यातीवर कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसारख्या देशांकडे चीनने आपला मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या बलुचिस्तान, सिंध आणि पंजाब प्रांतात गाढवांचे संगोपन केंद्र आणि विशेष कत्तलखाने उभारण्यात आले आहेत. इथे गाढवांची कातडी काढली जाते आणि नंतर ती चीनला पाठवली जाते.
स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
या वाढत्या मागणीमुळे पाकिस्तानच्या स्थानिक बाजारपेठेत गाढवांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. ज्याठिकाणी काही वर्षांपूर्वी गाढव २०-३० हजारांना मिळत होता, तिथे आता त्याच्यासाठी २.५ ते ३ लाख रुपये मोजावे लागत आहेत. हे ग्रामीण भागातील शेतकरी व मजूरवर्गासाठी आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत असले तरी काही प्राणी संरक्षण कार्यकर्त्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
पर्यावरणीय प्रभाव
गाढवांची अनिर्बंध कत्तल ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या ठरू शकते. अनेक देशांमध्ये गाढवांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशा परिस्थितीत ही वाढती मागणी त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच या प्राण्यांची फारशी काळजी न घेता फक्त आर्थिक फायद्यासाठी त्यांचा वापर होतोय, ही बाबही गंभीर चिंतेचा विषय ठरतो.
