Cleaning Tips : दिवाळीची साफसफाई करताना केवळ धूळ पुसू नका! या 6 गोष्टींकडेही द्या लक्ष
Diwali Home Cleaning Tips: दिवाळीच्या सणापूर्वी घराची स्वच्छता करताना केवळ धूळ आणि जाळी काढून चालत नाही, तर घरातील प्रत्येक कोपरा आणि वस्तू स्वच्छ करणेही महत्त्वाचे असते. दिवाळीची साफसफाई करताना कोणत्या ६ गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या.

दिवाळी म्हटली की घराची साफसफाई, सजावट आणि लाईटिंग याची लगबग सुरू होते. सणाच्या आधी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्यासाठी बहुतांश घरात विशेष मेहनत घेतली जाते. मात्र, कितीही साफसफाई केली तरी काही दिवसांत घरात पुन्हा धूळ, माती आणि किडे दिसू लागतात. यामागे घरातील काही लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष होणे हे कारण असू शकते. त्यामुळे दिवाळीची साफसफाई करताना केवळ दिसणाऱ्या जागाच स्वच्छ न करता घर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या ६ गोष्टींकडेही लक्ष द्या.
घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद असूनही धूळ आत येत असेल तर त्यांच्या आसपासच्या लहान फटी आणि छिद्रे तपासा. या फटींमधून धूळ, माती, ओलावा आणि लहान कीटक घरात येऊ शकतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार व्हाइट सिमेंट किंवा योग्य सीलंटचा वापर करून या फटी बुजवा.
दरवाजांच्या खालची जागा बंद करा
मुख्य दरवाजाच्या खालच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून धूळ, माती, उंदीर आणि किडे घरात येऊ शकतात. त्यामुळे या फटींकडे दुर्लक्ष करू नका. त्या बंद करण्यासाठी डोअर बॉटम सील किंवा सिलिकॉन ब्रशचा वापर करा.
मुख्य दरवाजाच्या परिसराची स्वच्छता करा
बूट आणि चपलांना लागलेली माती घरात पसरू नये यासाठी मुख्य दरवाजाचा परिसर स्वच्छ ठेवा. दरवाजाच्या आत आणि बाहेर डोअर मॅट ठेवा. तसेच चपला आणि बूट ठेवण्यासाठी शू रॅकची व्यवस्था करा.
चटई आणि कार्पेटची व्यवस्थित स्वच्छता करा
चटई, गालिचे आणि कार्पेटमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचते. केवळ वरवर झाडून ही धूळ निघत नाही. त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईदरम्यान कार्पेट काही वेळ उन्हात ठेवा आणि त्यानंतर व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा.
कपाट आणि बेडच्या मागील बाजूची स्वच्छता करा
कपाट, बेड आणि सोफ्यासारख्या जड फर्निचरच्या मागे तसेच खाली धूळ साचते. त्यामुळे साफसफाई करताना या जागांकडेही लक्ष द्या. शक्य असल्यास फर्निचर थोडे बाजूला करून मागील भाग आणि कोपरे व्यवस्थित झाडून-पुसून घ्या.
इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करताना काळजी घ्या
पंखा, फ्रिज, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यापूर्वी त्यांचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढा. स्विचबोर्ड किंवा इलेक्ट्रिकल उपकरणे पुसताना ओल्या कापडाचा वापर टाळा. पाणी गेल्यास विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा वस्तूंसाठी कोरड्या कापडाचा वापर करा.
