टेबल फॅनवर चिकटलेली धूळ हटवायचीय? मग ‘या’ सोप्या पद्धती वापरा
टेबल फॅन साफ करणं म्हणजे डोके दुखीच नाही का ? त्यामुळे पुढच्या वेळी फॅन पाहून त्रासून जाऊ नका, तर चुटकीत 'हे' घरगुती उपाय आठवून लगेच स्वच्छता सुरू करा

पावसाळा असो की उन्हाळा, घरातील टेबल फॅनचा उपयोग प्रत्येक घरात होतच असतो. पण बराच काळ वापरल्यावर त्यावर धूळ, चिकटपणा आणि बारीक कणांची थर जमा होऊ लागते. या गंधयुक्त आणि धूळभरलेल्या फॅनमुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे टेबल फॅन स्वच्छ ठेवणं अत्यावश्यक आहे. अनेकांना वाटतं की हे काम कठीण आहे, पण काही सोप्या घरगुती टिप्स वापरून तुम्ही अगदी सहजपणे टेबल फॅन स्वच्छ करू शकता.
टेबल फॅन स्वच्छ करताना ही काळजी घ्या
फॅन स्वच्छ करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅनचा प्लग काढून टाका. विद्युत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. एकदा फॅन इलेक्ट्रिक कनेक्शनपासून वेगळा झाला की, त्याची बाह्य जाळी (ग्रिल) आणि ब्लेड्स हलक्या हाताने वेगळी करा.
फॅनची ग्रिल आणि ब्लेड्स कशी स्वच्छ कराल?
एक टब घ्या आणि त्यात कोमट पाणी घाला. त्यात थोडं व्हाईट व्हिनेगर (सफेद सिरका) मिसळा. आता या पाण्यात मायक्रोफायबर कपडा भिजवा. थोडा वेळ ठेवल्यानंतर कपडा पिळून बाहेर काढा आणि त्याचा वापर करून ग्रिल आणि ब्लेड्स स्वच्छ पुसा.
जर धूळ हटत नसेल, तर एक सॉफ्ट ब्रश वापरू शकता. लक्षात ठेवा, स्वच्छ करताना कोणताही जोर वापरू नका, अन्यथा ग्रिल किंवा ब्लेड्स वाकू शकतात.
मोटर आणि इतर भागांची काळजीपूर्वक स्वच्छता
फॅनच्या मोटर भागावर जास्त धूळ साचलेली असते. यासाठी ओला कपडा वापरा. जर कपड्याने धूळ निघत नसेल, तर टूथब्रश किंवा छोटा व्हॅक्यूम क्लीनर वापरू शकता. फॅनच्या बॉडीला कोणताही ओलसरपणा राहू देऊ नका. स्वच्छतेनंतर सर्व पार्ट्स उन्हात वाळवून घ्या. हे केल्याने नमी टळते आणि बॅक्टेरिया किंवा बुरशीची शक्यता कमी होते.
डिग्रीझर वापरण्याचा पर्याय
जर फॅनवर खूप चिकट धूळ किंवा तेलकट थर जमा झाला असेल, तर तुम्ही डिग्रीझरचा वापर करू शकता. बाजारात सहज उपलब्ध होणारे हे स्प्रे क्लीनर वापरणं सोपं आणि प्रभावी आहे. मात्र डिग्रीझर वापरताना निर्देश वाचा आणि योग्य खबरदारी घ्या.
तेल लावणे विसरू नका
फॅनच्या जॉइंट्समध्ये थोडंसे मशीन तेल लावल्यास त्याचा परफॉर्मन्स चांगला राहतो. हे देखील दर काही महिन्यांनी करायला हवं.
दर आठवड्याला फॅन पुसा, त्रास टळेल
फॅनला दर आठवड्याला एकदा पुसून स्वच्छ केल्यास, त्यावर फारशी धूळ साचत नाही आणि मोठ्या साफसफाईची गरजही भासत नाही. नियमित देखभाल केल्यास तुमचा टेबल फॅन अधिक काळ उत्तम चालेल आणि घरातली हवा स्वच्छ राहील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
