पावसात कपडे वाळवणं बनतंय डोकेदुखी? मग वापरून पाहा ‘हे’ खास घरगुती उपाय!
पावसाळ्यात कपडे वाळवणं ही समस्या आता नाहीशी होऊ शकते, जर तुम्ही हे सोपे हॅक वापरले तर कमी वेळात कपडे कोरडे होतात आणि त्यांचा वास चांगला राहतो...

पावसाळा सुरु झाला की धुतलेले कपडे वेळेवर कोरडे होत नाहीत. हवेत ओलावा असल्यामुळे कपडे दिवसभर लावून ठेवले तरी ते अर्धवट ओले राहतात आणि त्यातून कुबट वास यायला लागतो. अशा वेळी अनेकांना वाटतं की वॉशिंग मशीनच्या ड्रायरचा वापर करावा, पण तो पर्याय सर्वांकडे उपलब्ध नसतो. त्यामुळे घरच्या घरी वापरता येणारे काही सोपे हॅक्स तुमचं काम खूपच सोपं करू शकतात. चला पाहूया, पावसात कपडे कोरडे करण्याचे ‘हे’ खास घरगुती उपाय नक्क आहेत तरी कोणते ?
1. स्मार्ट ‘हँगिंग’ पद्धत वापरा
कपडे वाळवताना ते एकमेकांना चिकटून लावण्याऐवजी शक्य तितक्या अंतरावर टांगा. यामुळे हवेला योग्य वाव मिळतो आणि कपडे लवकर सुकतात. एकाच दोरीवर खूप कपडे टांगण्याऐवजी वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये किंवा अँगर वापरून कपडे लावा.
2. हेअर ड्रायरचा वापर करा
अगदी ओले नसलेले, पण अर्धवट ओले कपडे लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करावा. विशेषतः कॉलर, स्लीव्ह्ज किंवा फॉर्मल शर्टसारख्या कपड्यांचे विशिष्ट भाग सुकवताना हे खूप उपयोगी पडते. हेअर ड्रायर गरम हवेचा प्रवाह देतो आणि थोड्याच वेळात कपडा कोरडा होतो.
3. तोल्याचा वापर करून घ्या अधिक ओलावा
खूप ओले कपडे लवकर सुकवण्यासाठी कोरड्या मोठ्या टॉवेलचा वापर करा. कपडा टॉवेलमध्ये गुंडाळा, थोडा वेळ दाबून ठेवा – यामुळे टॉवेल त्या कपड्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेतो. त्यानंतर हा कपडा टांगल्यास तो खूप लवकर सुकतो.
4. प्रेस करण्यापूर्वी कपडे थोडे वाळवा
कपडे सुकले नाहीत आणि घालायचे आहेत, अशा वेळी त्यांना थेट इस्त्री करू नका. त्याऐवजी कपडा उलटा करून थोडा सुकवा आणि नंतरच प्रेस करा. प्रेस करताना कपड्यावर सूती कपडा ठेवून इस्त्री केली, तर कपड्यांचे नुकसान होणार नाही.
5. पंख्याच्या खाली वाळवा
जर घरात हवेचा नीट वावर नसेल, तर कपड्यांना थेट पंख्याच्या खाली लावून ठेवा. एखादा स्टँड वापरून कपडे सगळ्या बाजूंनी हवेला उघडे ठेवा. शक्य असल्यास, एग्झॉस्ट फॅन किंवा डिह्युमिडिफायरचा वापर करा.
पावसाळ्यात कपडे सुकवणं आता डोकेदुखी राहणार नाही. वरील हॅक्स वापरून तुम्ही कपडे झटपट आणि सहज वाळवू शकता. वेळ वाचेल, कपड्यांचा वास चांगला राहील आणि रोजच्या कामात सुसूत्रता येईल. हे हॅक्स अगदी कोणताही खर्च न करता घरच्या घरी वापरता येतील!
