तुम्ही तणावात आहात का? कसं ओळखायचं?

मुंबई : अनेकदा आपण तणावग्रस्त असतो, नैराश्यग्रस्त असतो. मात्र, आपल्याला त्याची माहिती नसते. कारण आपण त्याबाबत कधी विचारच करत नाही. पण हे आपल्या आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट डॉ. रितिका अग्रवाल यांनी तणावाच्या काही सामान्य लक्षणांबाबत माहीती दिली आहे. वाढती  स्पर्धा  आणि  बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येकजण हा तणावात असतो. […]

तुम्ही तणावात आहात का? कसं ओळखायचं?
Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : अनेकदा आपण तणावग्रस्त असतो, नैराश्यग्रस्त असतो. मात्र, आपल्याला त्याची माहिती नसते. कारण आपण त्याबाबत कधी विचारच करत नाही. पण हे आपल्या आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट डॉ. रितिका अग्रवाल यांनी तणावाच्या काही सामान्य लक्षणांबाबत माहीती दिली आहे.

वाढती  स्पर्धा  आणि  बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येकजण हा तणावात असतो. स्वतःसाठी आता त्याला वेळ काढावा लागत आहे. स्वतःसाठीचा वेळ, घरच्यांसाठीचा वेळ, कामासाठीचा वेळ अशा सर्व पातळींवर त्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पण तरीही थांबून चालणार नाही हे त्याला माहीत असल्यामुळे तो निरंतर स्वतःला पुढे ढकलतो आहे.

मानसिक स्वास्थ्य टिकून राहणं फार आवश्यक आहे. जर मानसिक स्वास्थ्य असेल तर माणूस कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. अनेकदा आपल्यावर खूप तणाव आहे किंवा आपण नैराश्यग्रस्त आहोत हेच माहीत नसतं. पण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या सवयींवरून तुम्ही तणावग्रस्त आहात की, नाही हे कळतं. यासाठी तुम्ही मानसशास्त्रज्ञाची मदतही घेऊ शकता.

खाली सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीसाठी सारख्याच असतील असे नाही, मात्र यामध्ये तणावाची सामान्य लक्षणं सांगण्यात आली आहेत.

शारीरिक लक्षणं :

 • रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
 • डोकेदुखी, मायग्रेन, सामान्य वेदना आणि स्नायूंचा ताण अशा समस्या उद्भवणे
 • गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणं – पोटात दुखणे, अम्लता, मळमळ, अस्वस्थ पोट किंवा अल्सर
 • श्वसन विषयक लक्षणं – श्वास घेण्यात अडचण येणे, हायपरव्हेन्टिलेशन किंवा छातीच्या भागात दबाव जाणवणे
 • कार्डिओव्हास्कुलर लक्षणं – रक्तदाब आणि हृदयविकाराची वाढ
 • सतत थकल्यासारखे वाटणे
 • तणावाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देण्यासाठी रक्तातील साखरही वाढते
 • महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित येणे किंवा वेदनादायक मासिक पाळी येणे, तर पुरुषांना त्यांच्या प्रजनन प्रणालीच्या सामान्य कार्यामध्ये अडथळे येतात.

भावनिक लक्षणे :

 • चिडचिड, निराशा, रडावेसे वाटणे
 • नेहमीपेक्षा जास्त राग येणे
 • आत्मविश्वास गमावणे किंवा प्रत्येक बाबतीत माघार घेणे
 • तणावात असल्यामुळे भावनांवरुन नियंत्रण सुटणे
 • स्वतः बद्दल कमीपणा वाटणे

आकलनात्मक लक्षणे :

 • लक्ष केंद्रित करण्यास समस्या उद्भवणे
 • गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येणे
 • सतत चिंता करणे किंवा सर्वकाही विश्लेषित करणे
 • फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे – उदाहरणार्थ : आपण यशस्वीरित्या ज्या गोष्टी पूर्ण केल्या त्या 5 पैकी एक कार्य पूर्ण करण्यास असमर्थ झाल्यास त्यावरच नकारात्मक लक्ष केंद्रित करणे
 • त्वरित निर्णय घेण्यात अडचण येणे

वर्तनाची लक्षणे :

 • लवकर झोप न लागणे किंवा खूप झोप येणे
 • भूक कमी होणे किंवा वाढणे
 • स्वतःला इतरांपासून वेगळं करणे
 • पाय जमिनीवर घासत चालणे, तसेच नखं खाणे
 • एक काम पूर्ण करण्याच्याआधीच दुसऱ्या कामाचा विचार करणं आणि ते काम कसं पूर्ण करायचं या चिंतेत आधीचं काम अपूर्ण सोडणं
 • मद्य आणि सिगरेटचं व्यसन लागणं

वरील सर्व लक्षणं ही तणावग्रस्तांमध्ये बघायला मिळतात. जर तुम्हालाही तुमच्यात काही वेगळेपणा जाणवत असेल, जर तुम्हीही तणावाखाली असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें