आइस बाथ घ्यायचाय ? कोणासाठी योग्य, कोणी टाळावा ? घ्या जाणून
आइस बाथ काही लोकांसाठी एक प्रभावी थेरपी ठरू शकतो, पण तो सर्वांसाठीच सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे तुम्हीही आइस बाथ घेण्याचा विचार करत असाल, तर आधी हा लेख नक्की वाचा…

आजकाल आइस बाथ (Ice Bath) घेण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी, फिटनेस इन्फ्लुएंसर्स आणि अॅथलीट्स व्यायामानंतर बर्फाच्या पाण्यात बसलेले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. शरीराला तरतरी आणणारा हा अनुभव आरोग्यासाठी अनेक फायदे देतो, असं सांगितलं जातं. मात्र, प्रत्येकासाठी हा उपाय योग्य ठरेलच असं नाही. काही व्यक्तींनी आइस बाथ टाळणं अधिक सुरक्षित ठरू शकतं.
आइस बाथचे फायदे काय आहेत?
बर्फाच्या थंड पाण्यात शरीर काही वेळ ठेवल्यास अनेक फायदे होतात:
* नीट झोप येते: आइस बाथ घेतल्यावर शरीर थंडावते आणि झोप चांगली येते.
* त्वचेचा ग्लो वाढतो: थंड तापमानामुळे त्वचेची सूज कमी होते, पोर्स टाईट होतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं.
* वजन नियंत्रण: आइस बाथमुळे शरीरातील ब्राऊन फॅट अॅक्टिव्ह होतं, ज्यामुळे शरीर अधिक कॅलरीज खर्च करतं.
* तणाव कमी होतो: आइस बाथ घेतल्यावर शरीरात एंडॉर्फिन्स तयार होतात, जे तणाव कमी करण्यात मदत करतात.
पण… कोणी टाळावा आइस बाथ?
जरी आइस बाथचे फायदे आकर्षक वाटत असले, तरी काही लोकांसाठी तो आरोग्याला घातक ठरू शकतो.
1. हृदयविकाराचे रुग्ण:
ज्यांना आधीपासून हृदयविकार आहे किंवा कार्डियाक अरेस्टचा इतिहास आहे, त्यांनी आइस बाथ घेऊ नये. बर्फाच्या पाण्यात अचानक शरीर बुडवल्यास ब्लड प्रेशर झपाट्याने वाढू शकतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
2. ब्लड सर्क्युलेशन समस्याग्रस्त:
ज्यांना रक्ताभिसरणाशी संबंधित त्रास आहेत, त्यांच्यासाठी आइस बाथ धोकादायक असू शकतो. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
3. हाय किंवा लो ब्लड प्रेशर असणारे:
आइस बाथ घेतल्यावर शरीरात रक्तदाबात झपाट्याने बदल होतो. हाय बीपी असलेल्या रुग्णांचा ब्लड प्रेशर अधिक वाढू शकतो आणि लो बीपी असलेल्या व्यक्तींना चक्कर, थकवा किंवा बेहोशी येऊ शकते.
4. डायबिटीजचे रुग्ण:
डायबिटीजमुळे हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या येणे अशा समस्या असतात. आइस बाथ घेतल्यावर शरीराचे तापमान कमी झाल्याचे डायबिटीक रुग्णांना वेळेवर कळत नाही, यामुळे नसा खराब होण्याचा धोका वाढतो.
5. गर्भवती महिला:
प्रेग्नेंसीदरम्यान थंडीमुळे शरीरावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे गर्भधारणेच्या सुरळीत प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून गर्भवती महिलांनी आइस बाथ घेणं टाळावं.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
