तुमची मुलंही सतत रागवतात? मग आजपासून हे उपाय करा, लगेचच दिसेल फरक
सध्या अनेक पालक आपल्या मुलांच्या चिडचिडेपणामुळे आणि सततच्या रागामुळे त्रस्त आहेत. लहान वयात राग येणं हे सामान्य असलं, तरी तो जर सतत आणि तीव्र स्वरूपाचा असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं ठरतं.त्यामुळे आज आपण अशा काही सोप्या आणि प्रभावी टिप्स पाहणार आहोत,

सध्याच्या धकाधकीच्या जगात लहान मुलांमध्ये वाढती असहिष्णुता आणि चिडचिडेपणा हा पालकांसमोरील मोठा प्रश्न ठरत आहे. अनेक वेळा पालक हे आपल्या मुलांच्या सततच्या रागामुळे चिंतेत असतात. लहान वयात होणारा राग नैसर्गिक असला तरी तो सातत्याने आणि अनावश्यक पद्धतीने होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अशावेळी काही सुलभ उपाय आणि संवादाचे मार्ग वापरून मुलाच्या रागावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. चला जाणून घेऊया असे कोणते सोपे उपाय आहेत जे पालकांनी अमलात आणल्यास त्यांच्या मुलाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून येईल.
शांतता आणि संयम ठेवा
जेव्हा मूल रागावतो, तेव्हा सर्वात आधी तुम्ही स्वतः शांत राहा. तणावपूर्ण वातावरणात राग आणखी वाढतो. अशा वेळी मुलाला शांत आणि आवाज कमी असलेल्या जागेवर घेऊन जा. किंवा तुम्ही काही वेळासाठी दुसऱ्या खोलीत जाऊन त्याला एकटं राहू द्या. काही वेळाने त्याचा राग शांत होईल. अनेक वेळा आपण रागावलेल्या मुलाला गोड बोलून किंवा एखादी प्रिय वस्तू देऊन त्याचा मूड चांगला करू शकतो.
कारण जाणून घ्या
राग शांत झाल्यानंतर मुलाशी संवाद साधा. त्याच्याशी मोकळेपणाने बोला. रागावण्यामागे नेमकं कारण काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. एकदा का कारण कळलं की त्यावर उपाय करता येतो. बऱ्याचदा मुलं त्यांच्या मनातील गोष्टी बोलून दाखवत नाहीत, अशा वेळी त्यांना समजून घेण्यासाठी संवाद साधणं अत्यावश्यक ठरतं.
आत्मविश्वास वाढवा
मुलांना सतत टोमणे न मारता त्यांच्या चांगल्या सवयींचं आणि कृतींचं कौतुक करा. त्यांना प्रोत्साहन द्या. जर मूल शाळेमध्ये किंवा मित्रांच्या वागणुकीमुळे रागावत असेल, तर शिक्षक किंवा त्यांच्या पालकांशी संवाद साधा. मुलाला जेव्हा वाटतं की त्याच्या भावना समजल्या जात आहेत, तेव्हा त्याचा राग कमी होतो आणि तो विश्वासाने वागू लागतो.
अनुभवातून शिकवा
मुलाला रागावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोष्टी किंवा अनुभव सांगणं फायदेशीर ठरतं. उदाहरणार्थ, गोंधळाच्या वेळी कोणीतरी शांतपणे कसं वागलं याचे किस्से सांगू शकता. त्यांना समजवा की सतत रागावणं त्यांच्या आरोग्यावर आणि नात्यांवरही परिणाम करू शकतं. मारण्याऐवजी प्रेमाने समजावणं हेच अधिक प्रभावी ठरतं.
गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या
सर्व प्रयत्न करूनही मूल खूपच रागावत असेल, तर चाइल्ड सायकॉलॉजिस्ट किंवा काउंसलरचा सल्ला घ्या. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे त्याला समजावण्याची पद्धतही वेगळी असते. योग्य मार्गदर्शनाने तुमचं मूल अधिक समजूतदार आणि शांत स्वभावाचं होऊ शकतं.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
