Diwali Laxmi Pooja : यंदा लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त फक्त दोन तास, जाणून घ्या योग्य वेळ आणि विधी
दिवाळीतील लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. २०२५ मध्ये २१ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन साजरे केले जाईल. संध्याकाळी ७.४१ ते रात्री ९.४१ हा पूजेसाठी सर्वोत्तम शुभ मुहूर्त आहे. या दिवशी माता लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची विधिवत पूजा केल्याने घरात धन, आरोग्य व शांती प्राप्त होते,

दिवाळी म्हटलं की दिवे, रोषणाई, फटाके यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवसाला प्रचंड महत्त्व असते. दिवाळीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या दिवशी स्थिर धन-संपत्तीची देवी माता लक्ष्मी, बुद्धीचे आणि शुभ-लाभाचे प्रतीक असलेल्या गणपती देवाची आणि धनाचे रक्षण करणारे देव कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते.
भारतीय पंचांगानुसार, आश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजन केले जाते. यंदा अमावस्या तिथी दोन दिवसांत विभागली गेली आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने लक्ष्मी पूजन साजरे केले जाते. यंदा आश्विन अमावस्या तिथी २० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०३:४४ वाजता सुरू झाली असून, ती आज, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ०५:५४ वाजता समाप्त होत आहे. काही तज्ज्ञांनी प्रदोष काळ २० ऑक्टोबरला असल्याने त्या दिवशी पूजा करण्याचा सल्ला दिला होता, तर बहुतांश ज्योतिष्यांनी आज २१ ऑक्टोबरला पूजा करण्यास सांगितले आहे. मात्र, अमावस्या तिथी आज संध्याकाळी ५.५४ पर्यंत असल्याने, आज रात्री प्रदोष काळात पूजा करणे शुभ मानले जाईल.
लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त
लक्ष्मी पूजनासाठी प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा काळ) आणि वृषभ काल (स्थिर लक्ष्मीचा काळ) सर्वात शुभ मानला जातो. आज लक्ष्मीपूजन करण्यासाठी संध्याकाळी ७.४१ वाजेपासून ते रात्री ९.४१ वाजेपर्यंत सर्वोत्तम शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच प्रदोष काळ हा संध्याकाळी ६.१२ ते ८.४० पर्यंत असणार आहे.
लक्ष्मी पूजनाचे महत्त्व आणि विधी
माता लक्ष्मी, गणेश (बुद्धी व शुभ-लाभ) आणि कुबेर (धनाचे रक्षक) यांची विधिवत पूजा करण्याचा आजचा दिवस आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि स्वच्छ घरात तिचे दीर्घकाळ वास्तव्य राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
संक्षिप्त पूजा विधी
- पूजेच्या जागेची स्वच्छता करून पाट/चौरंगावर लाल वस्त्र पसरावे. त्यावर तांदळाच्या आसनावर लक्ष्मी-गणेशाची मूर्ती स्थापित करावी.
- यानंतर तुपाचा दिवा लावून पूजेला सुरुवात करावी.
- प्रथम गणेशाची पूजा करून, नंतर लक्ष्मी मातेला हळद-कुंकू, अक्षता, कमळाचे फूल अर्पण करावे.
- यावेळी ॐ महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा जप करावा.
- तयार केलेला फराळ, दागिने, पैसे समोर ठेवून नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती-लक्ष्मीची आरती करावी. शेवटी घरात पणत्यांची रोषणाई करावी.
- या पूजेने घरात केवळ पैसाच नव्हे, तर आरोग्य, यश आणि मानसिक शांती प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
