पावसात ऑफिस आणि शाळेचा प्रवास सोपा करणार्या 10 महत्त्वाच्या वस्तू
पावसाळ्यासाठी योग्य तयारी केल्यास तुम्ही केवळ स्वतःचं आरोग्य आणि सामान वाचवू शकता, असं नाही, तर तुमचं दैनंदिन रूटीनही अधिक आरामदायक आणि सुरळीत होईल. यंदाच्या पावसात तुमच्या बॅगमध्ये ही 10 महत्वाची साधनं असतील, तर प्रत्येक प्रवास नक्कीच सुखद ठरेल

पावसाळा आला की थंडावा आणि आनंद घेऊन येतो, पण त्यासोबत काही अडचणीही ओढवतात. ओले कपडे, चिखल, जाम आणि आजारपण यामुळे बाहेर पडणं त्रासदायक होऊ शकतं. मात्र जर काही आवश्यक गोष्टी आधीच सोबत ठेवल्या, तर हे सारे त्रास टाळता येऊ शकतात. यामुळे ऑफिस किंवा शाळेचा प्रवास अधिक सोयीचा होतो. खाली दिलेल्या 10 गोष्टी पावसाळ्यात निघण्याआधी पर्स किंवा बॅगमध्ये ठेवाच यामुळे वेळ, पैसा आणि आरोग्य तिघांचाच बचाव होईल.
मजबूत आणि हलकी छत्री पावसात कुठल्याही वेळी उपयोगी पडेल अशी छत्री बरोबर ठेवा. ती हलकी असली तरी वाऱ्याला तोंड देईल अशी असावी. एक छत्री नेहमी बॅगेत ठेवा, अचानक पाऊस आला तरी उपयोग होतो.
वॉटरप्रूफ बॅग किंवा कव्हर – मोबाईल, लॅपटॉप, कागदपत्रं भिजली तर मोठी समस्या होते. म्हणून पावसात बॅगसाठी वॉटरप्रूफ कव्हर किंवा थेट वॉटरप्रूफ बॅग वापरा.
रेनकोट किंवा पोंचो – दोन चाकीवर असणाऱ्यांसाठी रेनकोट म्हणजे कवचच! पोंचो पूर्ण शरीर झाकतो, त्यामुळे कपडे ओले होत नाहीत आणि सर्दी-खोकल्याचा त्रासही कमी होतो.
छोटं टॉवेल आणि जादा मास्क – हात-पाय पटकन पुसण्यासाठी टॉवेल ठेवा. पावसात मास्क पटकन ओले होतात, त्यामुळे 1-2 जादा मास्क बॅगेत ठेवलेले बरे.
पावसाळी शूज किंवा सँडल – कॅनव्हास किंवा लेदर शूज पावसात खराब होतात. त्याऐवजी रबर किंवा पीव्हीसीचे पावसाळी शूज वापरा टिकाऊ आणि साफ करायला सोपे.
पॉलीथिन बॅग किंवा झिपलॉक पाउच – मोबाईल, पर्स, चार्जर यांसारख्या वस्तू झिपलॉक पाउचमध्ये ठेवा. थोडी काळजी घेतली की मोठा खर्च वाचतो.
औषधं आणि सॅनिटायझर – डायरिया, सर्दी यांसारख्या लहान त्रासांसाठी बेसिक औषधं आणि हातांसाठी सॅनिटायझर ठेवा. अचानक तब्येत बिघडली तरी घाबरायचं कारण राहत नाही.
पॉवर बँक आणि चार्जिंग केबल – पावसात फोन पटकन डिस्चार्ज होतो. संपर्क तुटू नये म्हणून पॉवर बँक आणि केबल बरोबर ठेवा.
स्नॅक्स आणि पाणी – ट्रॅफिकमध्ये अडकला किंवा भूक लागली तर छोटं स्नॅक आणि बाटलीतलं पाणी खूप उपयोगी ठरतं. उकडलेली अंडी, बिस्किट्स, भेळ अशी सोपी पदार्थ बरोबर ठेवा.
थोडी कॅश – पावसात UPI किंवा कार्डने पेमेंट बंद पडलं, नेटवर्क गेला तर हातातली कॅश मदत करते.
