मुकेश अंबानींसारखं यश मिळवण्यासाठी ‘सहा’ खास गोष्टी!

मुकेश अंबानींसारखं यश मिळवण्यासाठी 'सहा' खास गोष्टी!

मुंबई : यश हे कुणालाही सहजासहजी मिळत नसतं. त्यासाठी व्यक्तीला मेहनत करावी लागते. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गात येणाऱ्या सर्व समस्यांना सामोरे जावं लागतं. आयुष्यात जर काही मिळवायचं आहे, तर त्यासाठी जिद्द हवी असते, खूप कष्ट करावे लागतात, तेव्हा कुठे हवं ते मिळतं. आज जगात जेव्हढी मोठी माणसं होऊन गेली, त्यासर्वांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे काहीतरी जगावेगळं करुन दाखवण्याची जिद्द आणि त्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी. जर या गोष्टी तुमच्यात असतील, तर तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता. आज आपण अशाच एका खास व्यक्तीबाबत जाणून घेणार आहोत.

कुठल्याही व्यक्तीच्या यशस्वी होण्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि बरंच काही असतं. कित्येक गोष्टी पणाला लावून तो तिथपर्यंत पोहोचलेला असतो. असेच एक व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इतंकच नाही तर ते आशिया खंडातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मुकेश अंबानी यांनाही त्यांचं हे ध्येय मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. आज ते देशातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत. मात्र, ते इथवर येऊन पोहोचले ते त्यांच्यातील काही खास गुणांमुळे. ते गुण कोणते आहेत ज्यामुळे मुकेश अंबानींनी इतंक यश मिळवलं आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतो.

चांगली टीम

जेव्हा एखादी व्यक्ती यशाची पायरी चढत असते, तेव्हा ती एकटी त्या यशाची मानकरी नसते. त्याच्यासोबत, त्याच्यासाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्या यशाची भागीदार असते. त्यामुळे तुम्ही व्यक्तींच्या सहवासात राहणे आवश्यक आहे, ज्यांच्यामध्ये तुमच्यासारखंच काहीतरी वेगळं करुन दाखवण्याची जिद्द असेल. एका चांगल्या टीमशिवाय कुणीही यश संपादन करु शकत नाही. त्यामुळे चांगल्या लोकांसोबत राहणे आणि जिद्दीने मेहनत करणे अत्यंत गरजेचं असतं.

सकारात्मकता

तुम्ही काहीही करत असाल, कुठलेही काम करत असाल त्यामध्ये तुम्ही सकारात्मक असणे खूप गरजेचे असते. कारण सकारात्मकतेने आपल्यातला आत्मविश्वास वाढतो, आपल्या सोबतच्या लोकांवरही त्याचा चांगला परिणाम होतो. जर तुम्ही नकारात्मक विचाराचे असाल, तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला नेहमी नकारात्मक गोष्टीच दिसतील. कुणी कितीही चांगलं काम करत असेल, तरी तुम्हाला ते पटणार नाही. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्यासोबतच्या लोकांवर त्याचा वाईट परिणाम होईल. असे लोक कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण, मुळात त्यांच्या मनात ते हरतील किंवा ते कुठलं काम करु शकणार नाहीत, अशाप्रकारचे नकारात्मक भाव असतात. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर कितीही मोठी समस्या असली, तरी तुमचा अॅटीट्यूड नेहमी सकारात्मक असायला हवा.

अपयशाने धडा घ्या आणि पुढे व्हा

जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर यशाची गोड चव चाखायची असेल तर अपयशाचा कडूपणाही सहन करावा लागेल. त्यामुळे अपयशाला कधीही घाबरु नका. त्यापासून धडा घ्या आणि पुढे व्हा. अपयशाचा अर्थ असा मुळीच नाही की, तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे तुम्हाला या दोन्हींना तोंड द्यावं लागेल.

ध्येय ठरवा

आजचं काम करु, उद्या काय करायचं आहे ते उद्या बघू, असा विचार करणं अत्यंत चुकीचं आहे. जर तुम्हाला उद्या काहीतरी मोठं करायचं आहे, तर त्याची पायाभरणी तुम्हाला आजपासून कारावी लागेल. जर आज तुम्ही छोटसं रोप लावाल तेव्हा कुठे उद्या त्याचा मोठा वटवृक्ष होऊ शकेल. कुठलंही काम नव्याने सुरु करताना तुम्हाला माहीत असायला हवं की, तुमचं ध्येय काय आहे. ध्येयाशिवाय तुम्ही काहीही करु शकत नाही. ध्येयाशिवाय आयुष्य म्हणजे वल्ल्ह्यांशिवाय नावेसारखं आहे. एक अशी नाव जी लाटांसोबत वाहत जाईल, पण तुम्हाला तुमच्या किनाऱ्यापर्यंत कधीही पोहोचवणार नाही.

मोठी स्वप्न बघा  

स्वप्न ही नेहमी मोठी बघावीत, ही शिकवण मुकेश अंबानींना त्यांच्या घरातून मिळाली. त्यांचे पिता धीरुभाई अंबानी यांनी मोठी स्वप्न बघितली आणि ती पूर्णही केली त्यासोबतच त्यांनी इतरांचीही स्वप्न पूर्ण केली. मुकेश अंबानी हे देखील त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत पुढे जात आहेत. केवळ 500 रुपयांत फोन लाँच करुन मुकेश अंबानी यांनी देशातील गरिबातील गरीब व्यक्तीच्या हातात मोबाईल दिला. त्यांच्या याच विचारसरणीमुळे ते जगावेगळे ठरले. त्यामुळे आयुष्यात काही वेगळं करायचं असेल तर आपले विचार आणि स्वप्न ही नेहमी मोठी असायला हवीत.

संकटांना कधीही घाबरायचं नाही

मुकेश अंबानी यांनी लहान वयातच आपल्या वडिलांच्या उद्योगात त्यांची मदत करण्यास सुरुवात केली. पण, एक यशस्वी उद्योगपती होण्यासाठी काय करावं लागतं, हे शिकण्याआधीच त्यांचे वडील धीरुभाई अंबानी आणि काका रसिकभाई यांचा मृत्यू झाला. पण, मुकेश अंबानी यांनी हार मानली नाही. त्यांनी धीर सोडला नाही. वडील सोडून गेल्यानंतरही मुकेश अंबानी यांनी त्यांचा उद्योग मोठ्या जबाबदारीने सांभाळला. फक्त सांभाळलाच नाही तर त्याला आणखी मोठं केलं. इतकं मोठं की आज ते जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींच्या पंगतीत येऊन बसले आहेत.

त्यामुळे तुम्हालाही मुकेश अंबानींसारखं यशस्वी व्हायचं असेल, तर त्यांच्यातील हे महत्त्वाचे गुण आत्मसात करा. मग, कुणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI