उष्माघाताची लक्षणं काय आणि काळजी कशी घ्याल?

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 22:16 PM, 29 May 2019
उष्माघाताची लक्षणं काय आणि काळजी कशी घ्याल?

मुंबई : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कहर सुरु आहे. नागपुरात काल 47.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. तर चंद्रपुरात आज देशातील सर्वोच्च 48 सेल्सिअस तापमानाचा नोंद करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षातील हे दुसरं सर्वोच्च तापमान आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात उन्हाचा तखाडा पाहायला मिळतो आहे. लोकच नाही तर पशू-पक्षीही गर्मीने हैरान झाले आहेत. तर पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

वाढत्या तापमानामुळे विदर्भात तसेच महाराष्ट्रात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरात गेल्या 48 तासात उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये यासाठी काय करावं, उष्माघाताची लक्षणं काय आणि उष्माघातावर काय उपचार करावा हे माहीत असणे गरजेचं आहे.

उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?

 • चक्कर येणे
 • डोकं दुखणे
 • सुस्ती आल्यासारखं वाटणे आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे
 • गरम होत असूनही घाम न येणे
 • त्वचा लालसर होणे
 • त्वचा कोरडी पडणे
 • अशक्तपणा जाणवणे
 • मळमळ होणे, उलट्या होणे
 • जोरात श्वास घेणे
 • हृदयाचे ठोके वाढणे

जर कधी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणामध्ये ही वरील लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो आहे हे समजावं आणि त्याला तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावी.

उष्माघातावर काय उपचार कराल?

 • एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास होत असल्यास त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करा
 • रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत थंड जागेत ठेवा
 • रुग्णाला झोपवून त्याचे पाय थोड्या उंचीपर्यंत वर करा
 • रुग्ण हा बेशुद्ध झाला असेल तर त्याला तात्काळ जवळच्या कुठल्याही क्लिनिकमध्ये आयव्ही लावण्याची व्यवस्था करा
 • रुग्णाला पाणी द्या, तो शुद्धीत असेल तर त्याला ग्लूकोजयुक्त ड्रिंक्स द्या
 • थंड पाणी, स्प्रे किंवा आईस पॅकने त्याचं शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा

उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?

 • भरपूर प्रमाणात पाणी प्या, दररोज 8 ग्लास पाणी प्यायला हवं, ते शरीरासाठी आवश्यक आहे
 • अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करा, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहील
 • हलका पण पौष्टिक आहार घ्या, आहारात काकडी, कलिंगड, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा
 • सुती कपड्यांचा वापर करा
 • बराच वेळ उन्हात राहावं लागत असेल तर त्वचेवर पाणी शिंपडत राहा, तसेच थोड्या थोड्या वेळानी पाणी प्या
 • दुपारचं बाहेर पडणं टाळा, विशेषकरुन सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत बाहेर उन्हात पडू नका
 • उन्हात असाल तर टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करा
 • अतिरिक्त मद्यमान, साखर असलेले पेय किंवा कॅफेन असलेले पेय टाळा, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते
 • अतिप्रमाणात व्यायाम करणं टाळा

उष्माघात होऊनये यासाठी त्यापासून स्वत:चा बचाव करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे उन्हात बाहेर जाणं टाळा, गरज असेल तेव्हाच बाहेर पडा, बाहेर जाताना नेहमी डोकं आणि शरीर कपड्याने झाकलेलं असावं हे सुनिश्चित करा, पाणी पित राहा, थंड पदार्थांचं सेवन करत राहा. सावधानता बाळगा आणि या उन्हाळ्यात सुरक्षित राहा.