ऑनलाइन घागरा खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा तुमचे पैसे वाया गेले म्हणून समजा
सण, समारंभ आणि लग्नामध्ये अनेक महिला घागरा घालण्याला पसंती देत आहेत. पण घागरा खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन शॉपिंगच्या काळामध्ये बरेच जण घागरे देखील ऑनलाइनच मागवतात पण ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.

आता लग्न सराईला सुरुवात झाली आहे. ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली असेल. लग्नाचे दिवस वधू आणि वर तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र मैत्रिणींसाठी खूप खास असतात. घरात कोणाचेही लग्न ठरले की महिला आणि मुली खरेदीला सुरुवात करतात. सध्याच्या काळात महिला ऑनलाइन शॉपिंग करण्याला प्राधान्य देत आहे. जर तुम्ही ही घागरा ऑनलाइन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा असे दिसून येते की ऑनलाईन घागरा खरेदी केल्यामुळे पैसे वाया जातात. जाणून घेऊ अशा काही गोष्टींबद्दल जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जाणार नाही.
योग्य वेबसाईटवरून खरेदी करा
तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असल्यास नेहमी विश्वसनीय आणि प्रमाणित वेबसाईटवरून खरेदी करा. बनावट वेबसाईट टाळण्यासाठी त्याची युआरएल काळजीपूर्वक तपासा. आज-काल इंस्टाग्राम वर अशी अनेक पेज सक्रिय आहेत ज्या ठिकाणी घागरे अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. अशी काही पेजेस आहेत जी तुम्हाला चांगल्या प्रतीचे घागरे पाठवतील पण त्यासोबतच अशी देखील काही आहेत जे तुमच्याकडून पैसे घेतल्यानंतरही तुम्हाला काहीही पाठवणार नाहीत किंवा चुकीची वस्तू पाठवतील.अशा तक्रारी आपण अनेकदा ऐकतो.
साईज बघून घ्या
ऑनलाइन घागरा खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम तुमची साईज योग्यरीत्या तपासून घ्या आणि घागऱ्यासोबत दिलेल्या साईजच्या चाटशी जुळवा साईजच्या पर्यायाबद्दल गोंधळ असल्यास त्या वेबसाईटशी संबंधित व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न करा पण साईज योग्य बघूनच घ्या.
कपड्याची गुणवत्ता तपासा
जेव्हा तुम्ही काही ऑनलाईन खरेदी करतात तेव्हा त्याचे वर्णन वाचा. घागरा घेताना त्याचा कपडा बघा जसे की सिल्क, जॉर्जेट, नेट आणि त्याची गुणवत्ता काळजीपूर्वक वाचा. घागरा तुम्हाला शोभत असल्यासच खरेदी करा अन्यथा खरेदी करू नका.
रिटर्न आणि रिफंड पॉलिसी बघा
खरेदी करण्यापूर्वी रिटर्न आणि रिफंड पॉलिसी काय आहे ते जाणून घ्या. तुम्हाला घागरा आवडला नसेल किंवा तो खराब असेल तर तो परत करण्याचा पर्याय आहे का हे तपासा. अनेक वेळा रिफंड पॉलिसी नसल्यामुळे पैसे वाया जाण्याची शक्यता असते.
ग्राहकांनी दिलेले रिव्यू बघा
अनेकवेळा वेबसाईट वर दिलेले फोटो हे एडिट केलेले असतात त्यामुळे ग्राहकांनी अपलोड केलेले फोटो तपासा आणि खात्री करा. त्या घागऱ्याविषयी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही रिव्यू कडे लक्ष द्या. घागऱ्याचा खरा फोटो दिलेला नसेल तर त्याची रिफंड पॉलिसी पाहूनच तो खरेदी करा. जेणेकरून तुमचा घागरा खराब निघाल्यास तो परत करता येईल.
डिलिव्हरी वेळ आणि शुल्क पहा
तुम्ही घागरा खरेदी करताना तो एखाद्या खास प्रसंगासाठी खरेदी करतात त्यामुळे डिलिव्हरीची वेळ तपासूनच घ्या. मोफत डिलिव्हरी आहे की नाही हे देखील बघा अगदी शेवटी डिलिव्हरी तारीख असल्यास ऑर्डर करणे टाळा. काही वेळा काही कारणाने तारीख दिली आहे त्यापेक्षा तो उशिरा येऊ शकतो.
