व्हिसासाठी अर्ज करताय? रिजेक्शनची कारणं ठरू शकतात ‘या’ 5 चुका
Visa Application Tips: पहिल्यांदाच परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर व्हिसा अर्ज भरताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. छोट्या चुका किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात, हे जाणून घेऊया.

परदेशवारीचा प्लॅन करताना उत्साहाच्या भरात एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम व्हिसावर होऊ शकतो. विशेषतः पहिल्यांदाच परदेशात जाणाऱ्यांनी व्हिसा अर्ज भरताना प्रत्येक माहिती आणि कागदपत्र काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. अर्जातील छोटीशी चूक, अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीची माहितीही व्हिसा रिजेक्शनचे कारण ठरू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष रवी गोसाईं यांनी व्हिसा अर्ज करताना टाळावयाच्या काही सामान्य चुका सांगितल्या आहेत.
व्हिसा अर्ज भरताना नाव, पासपोर्ट क्रमांक, जन्मतारीख किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची भरली जाणार नाही, याची काळजी घ्या. अगदी छोट्या चुकीमुळेही अर्ज प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. अर्ज सबमिट करण्यापूर्वी पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांशी प्रत्येक माहिती नीट तपासून घ्या. अर्ज स्ट्राँग दिसावा म्हणून चुकीची किंवा खोटी माहिती देणे टाळा.
आर्थिक स्थितीचा पुरावा व्यवस्थित द्या
परदेशातील संपूर्ण प्रवासाचा खर्च करण्याची आर्थिक क्षमता आहे, हे काही देशांच्या व्हिसा प्रक्रियेत महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप्स, आयकर कागदपत्रे किंवा उत्पन्नाचा योग्य पुरावा मागितला जाऊ शकतो. जुनी, अस्पष्ट किंवा अर्जातील माहितीसोबत विसंगत आर्थिक कागदपत्रे दिल्यास प्रश्न निर्माण होऊ शकतात.
प्रवासाचा उद्देश स्पष्ट असू द्या
तुम्ही पर्यटनासाठी जात असाल, नोकरीसाठी, शिक्षणासाठी किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी, व्हिसा अर्जात त्याचा उद्देश स्पष्ट असणे आवश्यक आहे. अर्जातील माहिती आणि त्यासोबतची कागदपत्रे एकमेकांशी जुळली पाहिजेत. उदाहरणार्थ, पर्यटक व्हिसासाठी अर्ज करून कागदपत्रांमध्ये नोकरी करण्याचा उल्लेख आढळल्यास अर्जावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
बनावट कागदपत्रांचा वापर करू नका
बँक स्टेटमेंट, नोकरीचे पत्र, हॉटेल बुकिंग किंवा इतर कोणतेही बनावट कागदपत्र देणे गंभीर ठरू शकते. व्हिसा अधिकारी कागदपत्रांमधील माहितीची पडताळणी करू शकतात. बनावट कागदपत्रे आढळल्यास सध्याचा अर्ज तर नाकारला जाऊ शकतोच, शिवाय भविष्यातील व्हिसा अर्जांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
व्हिसासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे तपासा
प्रत्येक देशाचे व्हिसा नियम आणि आवश्यक कागदपत्रे वेगवेगळी असतात. अर्ज, फोटो, प्रवास विमा, बायोमेट्रिक्स, मुलाखत किंवा इतर आवश्यक कागदपत्रांपैकी काहीही राहू नये. केवळ ट्रॅव्हल एजंटच्या माहितीवर अवलंबून न राहता संबंधित देशाच्या अधिकृत इमिग्रेशन वेबसाइटवर जाऊन ताज्या नियमांची माहिती घ्या. यामुळे अर्ज करताना अनावश्यक चुका टाळता येतील.
