Vastu Tips: घरातील सुख-शांती टिकवून ठेवायची असेल तर करा हे सोपे उपाय, वाईट नजरही राहील दूर!
घरात सतत वादविवाद, कामात अडथळे किंवा नकारात्मक वातावरण जाणवत असेल तर वास्तुशास्त्रानुसार काही उपाय करता येतात. घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.

आपले घर हे कुटुंबातील प्रत्येकासाठी सुख, समाधान आणि सुरक्षिततेची जागा असते. मात्र, अनेकदा घरात विनाकारण वाद होणे, प्रत्येक कामात अडथळे येणे, सदस्यांची चिडचिड वाढणे किंवा नकारात्मक वातावरण जाणवणे अशा समस्या उद्भवतात. वास्तुशास्त्रानुसार, यामागे वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते, अशी मान्यता आहे. घरातील सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी काही पारंपरिक उपाय सांगितले जातात. जाणून घ्या, घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी कोणते उपाय करावेत.
मुख्य दरवाजाला लिंबू-मिरची लावा
वास्तुशास्त्रानुसार, घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी मुख्य दरवाजाला लिंबू-मिरची लावणे शुभ मानले जाते. शनिवारी प्रवेशद्वारावर लिंबू आणि मिरची टांगावी. दर शनिवारी जुनी लिंबू-मिरची बदलून नवीन लावण्याची परंपरा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते, अशी मान्यता आहे.
मिठाच्या पाण्याने घर पुसा
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ मिसळावे. या पाण्याने संपूर्ण घराची स्वच्छता करावी. वास्तुशास्त्रानुसार, मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होऊन वातावरण प्रसन्न राहते, असे मानले जाते.
घरात कापूर जाळा
घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सकाळी कापूर आणि लोबान जाळण्याचा उपाय सांगितला जातो. काही ठिकाणी यासोबत गोवऱ्यांचाही वापर केला जातो. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र, धुराचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
घराच्या छतावर कचरा साचू देऊ नका
घराच्या छतावर जुने सामान, अनावश्यक वस्तू आणि कचरा साचू देऊ नये. वास्तुशास्त्रानुसार, अस्वच्छता आणि पसारा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे छताची नियमित स्वच्छता करावी आणि निरुपयोगी वस्तू काढून टाकाव्यात.
घरात तुटलेला आरसा ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, घरात तुटलेला आरसा किंवा काच ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि वाईट नजरेचा प्रभाव पडतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे तुटलेला आरसा किंवा काच आढळल्यास तो त्वरित घरातून काढून टाकावा.
घरात भजनं लावा
घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी भजने लावावीत. तसेच नियमित ‘ॐ’चा जप करावा. यामुळे मन शांत राहण्यास आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
