बारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर

बारामती : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, महाराष्ट्रात निर्माण झालेला धनगर आरक्षणाचा प्रश्न यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी झगडावं लागलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि […]

बारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

बारामती : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, महाराष्ट्रात निर्माण झालेला धनगर आरक्षणाचा प्रश्न यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी झगडावं लागलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आघाडीकडून महादेव जानकर यांनी आव्हान निर्माण केलं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर आणि काही प्रमाणात भोर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळून त्यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 719 मतांनी पराभव केला.

जानकर यांना अनपेक्षितपणे दौंड, खडकवासला आणि पुरंदरमधून आघाडी मिळाली होती. याच निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वतीने निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे यांना 26 हजार 396 मते मिळाली. तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार काळुराम चौधरी यांनी 24 हजार 908 मते मिळाली. एकूणच 2014 च्या निवडणुकीतील मोदी लाट, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न यामुळे  तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीची अक्षरश: कोंडी झाली होती. मात्र बारामती, इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांची साथ मिळाल्याने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला.

2019 निवडणुकीतील चित्र कसं असेल?

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तत्पूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील निवडणुकीसारखी दैना होऊ नये म्हणून लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केलंय. मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देऊन तेथील समस्या, लोकांचे प्रश्न सोडवून देण्यावर त्यांचा विशेष भर असल्याचे पाहायला मिळते. त्याचवेळी त्यांनी अधिकाधिक लोकोपयोगी कामे मार्गी लावण्याकडेही लक्ष दिले आहे.

इतकेच नव्हे तर महाविद्यालयीन तरुणांमध्ये पोहोचण्यासाठीही त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मतदारसंघातील संपर्क आणि कामे करण्याची पद्धत पाहता सुप्रिया सुळे यांच्यासाठी 2019 ची निवडणूक सोपी ठरु शकते. संसदेतील उपस्थिती, उपस्थित केलेले प्रश्न आणि सलगपणे मिळालेला उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार यामुळे त्यांच्या कामगिरीबाबत शंका उपस्थित करण्याचे कारणच उद्भवत नाही.

सुप्रिया सुळे यांनी अलिकडील काळात मतदारसंघनिहाय यंत्रणा निर्माण करत नागरिकांची कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा फारसा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघात जाणवणार नाही. मात्र त्याचवेळी सरकारची कर्जमाफी, शेतकर्‍यांची झालेली बिकट परिस्थिती, भाजप सरकारकडून धनगर समाजाची झालेली फसवणूक या बाबी मात्र सुप्रिया सुळे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार्‍या आहेत.

2019 निवडणूक संभाव्य उमेदवार

महादेव जानकर : दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वेळोवेळी आपणच बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. 2014 च्या निवडणुकीपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणावरुन वातावरण तापले होते. त्यामुळे जानकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळे यांची दमछाक केली. अवघ्या 69 हजार 719 मतांनी जानकर यांचा पराभव झाला. त्यावेळी सुळे यांच्या विजयापेक्षा जानकर यांच्या पराभवाची आणि त्यांनी दिलेल्या लढतीचीच चर्चा अधिक झाली होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. 2014 च्या तुलनेत अनेक कारणांस्तव जानकर यांची पिछेहाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मंत्रीपद घेणार नाही असे सांगणारे जानकर आरक्षण न मिळताच मंत्रीपद घेऊन पुढे धनगर समाजामुळे मी मंत्री झालेलो नसल्याचे सांगतात ही बाब धनगर समाजाला खटकणारी आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या निवडणुकीत आरक्षण मिळेल या आशेवर बारामतीसह, इंदापूर, दौंडमध्ये धनगर समाजाने जानकर यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. मात्र आताची परिस्थिती पाहता धनगर समाजाने भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर आरक्षण न मिळाल्यामुळे या समाजाची भाजप सरकारवर नाराजी आहे. या सर्व बाबींचा फटका महादेव जानकर यांना बसू शकतो. त्याचवेळी मतदारसंघात ज्या पद्धतीने जनसंपर्कच नसल्याने ऐन निवडणूक काळात जानकरांची दमछाक होऊ शकते.

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना लाल दिवा देण्याची घोषणा महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणूक प्रचारावेळी केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरल्याने काही प्रमाणात कुल समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यातच जानकर यांनी स्वत:साठीच मंत्रीपद घेतल्याने त्यांनी शब्द न पाळल्याची भावनाही दौंडकरांमध्ये आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत ज्या दौंड मतदारसंघाने जानकरांना साथ दिली, त्याही ठिकाणी जानकर यांची पिछेहाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच महादेव जानकरांसाठी 2019 ची लोकसभा निवडणूक तारेवरची कसरत ठरु शकते.

विजय शिवतारे : 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करत लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र महाआघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने विजय शिवतारे यांना माघार घ्यावी लागली. आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी लोकसभा लढवण्याची मानसिकता ठेवली आहे. लोकसभा मतदार संघात त्यांनी अद्याप जनसंपर्क मोहिम सुरु केली नसली तरी वेळोवेळी खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य करण्यावर त्यांचा भर असल्याचे पाहायला मिळते. त्यातूनही त्यांना उमेदवारी मिळालीच तर कडवे पवार विरोधक म्हणून त्यांना या निवडणुकीत काही प्रमाणात का होईना जनाधार मिळू शकतो. सध्या शिवतारे हे जलसंपदा राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरवर त्यांची मजबूत पकड आहे. मात्र अन्यत्र त्यांचा फारसा वावर नसतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकताच व्यक्त होत आहे.

सौ. कांचन राहुल कुल : दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल अशी चर्चा मागील काही दिवसात होत आहे. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील असून त्या पवार कुटुंबीयांच्या नात्यातील आहेत. सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी त्यांचा काही उपयोग होईल का याचीही चाचपणी केली जात आहे. मात्र कांचन कुल यांची कामगिरी पाहता, त्या दौंडमध्ये काही प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे दौंड वगळता अन्य कोणत्याही मतदारसंघात त्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर तग धरु शकत नाहीत अशीच स्थिती सध्यातरी पाहायला मिळते. त्यामुळे कांचन कुल यांच्या उमेदवारीची केवळ चर्चाच आहे की त्या प्रत्यक्षात निवडणूक लढवतील हे येणार्‍या काळात समोर येणार आहे.

निवडणुकीतील मुद्दे

मागील निवडणुकीत धनगर आरक्षणावरच लोकसभा निवडणूक गाजली. याही निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजू शकतो. बारामतीमध्ये धनगर समाजाने केलेल्या आंदोलनावेळी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार वर्षांनंतरही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

भाजप सरकारने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभच झालेला नाही. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. नोटाबंदीने अनेक कंपन्या बंद पडून बेरोजगारी वाढली अशा अनेक मुद्यांचा उहापोह या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून होईल. त्याचवेळी निवडणूक काळात चर्चेला येणारा बारामती तालुक्यातील जीरायत भागातील पाण्याचा प्रश्न हाही कळीचा मुद्दा ठरु शकतो. मात्र यावेळी सत्तेत असलेल्या भाजप आणि मित्रपक्षांना या मुद्यांवरुन घेरले जाईल.

एकूणच 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षभरापासूनच तयारी सुरु केलीय. त्या तुलनेत विरोधी पक्षांची तयारी अत्यल्प आहे. त्याचवेळी सध्याच्या सरकारवर असलेल्या नाराजीचा प्रचंड फटका विरोधी उमेदवाराला बसू शकतो. मराठा समाजाला आरक्षण देऊन धनगर समाजाला मात्र ताटकळत ठेवणेही भाजप उमेदवाराला न परवडणारे आहे. त्यामुळे सध्यातरी एकूणच मतदारसंघातील परिस्थिती पाहता खासदार सुप्रिया सुळे यांचेच पारडे जड दिसत आहे.

2014 च्या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे

एकूण मतदान 18 लाख 13 हजार 543

खासदार : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) 69 हजार 719 मतांनी विजयी

महादेव जानकर यांचा पराभव

लोकसभा निवडणूक 2014

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)       : 521562

महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष)  : 451843

सुरेश खोपडे (आप)            : 26396

काळुराम चौधरी (बहुजन समाज पक्ष) : 24908

बारामती लोकसभा मतदार संघात येणारे विधानसभा मतदार संघ आणि विद्यमान आमदार    

1) बारामती  : अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

2) इंदापूर : दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

3) दौंड : राहुल कुल (राष्ट्रीय समाज पक्ष)

4) पुरंदर : विजय शिवतारे (शिवसेना)

5) भोर : संग्राम थोपटे (काँग्रेस)

6) खडकवासला : भिमराव तापकीर (भाजप)

लोकसभेसाठी संभाव्य विरोधी उमेदवार :

1) महादेव जानकर

2) विजय शिवतारे

3) सौ. कांचन राहुल कुल

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.