जळगाव : हॉटेलात सर्वजण चहा पित होते, अन् मोठा स्फोट, १० ते १५ जण जखमी
जळगाव जिल्ह्यातील एका हॉटेलात मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेत दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

एका हॉटेलात मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात घडली आहे. या स्फोटात १० ते १५ जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.या स्फोटाचा आवाज मोठा झाल्याने या परिसरात एकच घबराट पसरली. या स्फोटाचे नेमके कारण समजलेले नाही. या स्फोटातील जखमींवर भडगाव पाचोरा येथे उपचार सुरु आहेत.
जळगावातील भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नवी मिलन हॉटेलमध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.या स्फोटात या हॉटेलात चहा पिण्यासाठी बसलेले दहा ते पंधरा ग्राहक जखमी झाले. या स्फोट इतका मोठा होता की संपूर्ण परिसर हादरुन गेला. त्यामुळे या परिसरात काही वेळ गोंधळ उडाला. कोणाला काय झाले हे नेमके समजेना. त्यानंतर नागरिकांनी जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली.
मोठा कानटळ्या पसरवणार आवाज
भडगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नवी मिलन हॉटेलमध्ये ग्राहक सकाळी चहा प्यायला बसले होते. त्यावेळी किचनमधून मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे हादरुन गेला. या स्फोटातील जखमी झालेल्या १० ते १५ जणांना तातडीने उपचार मिळावे यासाठी अपघातानंतर भडगावकरांनी तत्काळ मदत करण्यास धाव घेतली. जखमींना विविध वाहनांतून पाचोरा व जळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.
स्फोट नेमका कशाचा ?
हा स्फोट झाल्यानंतर त्याचा मोठा आवाज झाला होता. त्यामुळे हा स्फोट नेमका कशाचा याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. हा स्फोट गॅस सिलींडरचा की फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा यावरुन संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि परिस्थितीचा आढावा घेत मदत कार्याला हातभार लावला. दरम्यान, स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नसून काहींच्या मते हा स्फोट सिलेंडरचा तर काहींच्या मते फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट असावा अंदाज व्यक्त केला जात आहे.पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
