महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी देशाभरातून 1846 अर्ज, विजेत्याला 15 लाखांपर्यंत कार्यादेश, शासकीय खात्यात कामाची संधी
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात देशभरातील 1 हजार 846 स्टार्टअप्सनी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक 320, शेतीविषयक 252, शिक्षणविषयक 238 अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना (स्टार्टअप्स) सादर झाल्या असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (1846 applications from all over the country for Maharashtra Startup Week, work order of up to Rs 15 lakhs)
तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणे हा या सप्ताह आयोजनामागील उद्देश असून सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये त्यांच्या नवसंकल्पनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येतील, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी 12 मे 2021 पासून www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले आहेत. 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून 1 हजार 846 अर्ज प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून सर्वाधिक 947 अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या अर्जांची तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल आणि जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात टॉप 100 स्टार्टअपची यादी जाहीर केली जाईल. टॉप 100 स्टार्टअप्सना 9 ते 13 ऑगस्ट, 2021 दरम्यान गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. कोरोना साथीमुळे सर्व सादरीकरण सत्रे ही ऑनलाईन पद्धतीने होतील. यातील विजयी 24 स्टार्टअप्सना त्यांच्या नवसंकल्पना शासनाच्या संबंधित विभागात वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या कामांचे आदेश देण्यात येतील, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
यंदाच्या स्टार्टअप सप्ताहामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 947 स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. त्यानंतर कर्नाटक 202, दिल्ली 87, गुजरात 54, केरळ 64, मध्य प्रदेश 34, तामिळनाडू 89, तेलंगणा 56, उत्तरप्रदेश 75, राजस्थान 37, हरयाणा 32 याप्रमाणे विविध 27 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील एकूण 1 हजार 846 स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक 322 अर्ज पुण्यातून आले आहेत. तर मुंबई 212, मुंबई उपनगर 70, औरंगाबाद 19, कोल्हापूर 13, नागपूर 42, नाशिक 52, पालघर 13, रायगड 23, ठाणे 97 याप्रमाणे विविध जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत.
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी देशभरातील १,८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेती- २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या आहेत. विजेत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश मिळणार आहेत- कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp यांची माहिती pic.twitter.com/DK6i6XuTBE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 27, 2021
आरोग्यविषयक 320, कृषीविषयक 252, शिक्षणविषयक 239, गव्हर्नन्सविषयक 72, कौशल्यविषयक 94, स्मार्ट पायाभूत सुविधाविषयक 476, परिवहनविषयक 126, शाश्वत हरित उर्जाविषयक 57, घनकचरा व्यवस्थापनविषयक 110, पाणी व्यवस्थापनाबाबत 51 तर इतर विविध विषयांबाबतच्या 349 स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी अर्ज केला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांच्या नवसंकल्पनांना मोठ्या प्रमाणात चालना आणि प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
UK FCDO आणि महाराष्ट्र राज्यात सामंजस्य करार, हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना मिळणार
(1846 applications from all over the country for Maharashtra Startup Week, work order of up to Rs 15 lakhs)
