घरातून निघाले ते परतलेच नाही… एकाच दिवशी एकाच गावातील तिघा मित्रांचा अपघातात मृत्यू… बुलढाण्यात हळहळ
Accident : बुलढाणा-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धाड गावाजवळ जवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात दुचाकी वरील 3 युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाणा-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धाड गावाजवळ जवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात दुचाकी वरील 3 युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिवशाही एसटी बस छत्रपती संभाजी नगरहून बुलढाण्याकडे जात होते. त्यावेळी समोरून दुचाकी आली दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 3 तरुणांनी जीव गमावला आहे.
शिवशाही बस आणि दुचाकीचा भीषण अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, धाड गावाजवळ शिवशाही बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत तातडीने रुग्णवाहिका बोलवली. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे या तरुणांचा मृत्यू झाला होता.
3 तरूणांचा जागीच मृत्यू
कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे या तिघांचे वय 20 च्या आसपास आहे. हे तिघे संभाजीनगरच्या दिशेने जात होते, मात्र शिवशाही बसला धडक बसल्याने या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील रहिवासी आहे. या अपघातामुळे या गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर वाहतूक कोंडी
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यामुळे अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आता पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. या घटनेमुळे कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. यात दुचाकी चाकलाच्या बाजूने बसला घडकली असल्याचे दिसत आहे. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. या अपघानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली असल्याचीही माहिती समोर आली आहे.
