ST Strike Video | उस्मानाबाद आगारात संपकरी कर्मचाऱ्यांचा गोंधळ, तणावाने कंडक्टर बेशुद्ध

ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Strike) सरकारने तोडगा काढूनही आंदोलनाची धार कमी झालेली नाही.

ST Strike Video | उस्मानाबाद आगारात संपकरी कर्मचाऱ्यांचा गोंधळ, तणावाने कंडक्टर बेशुद्ध
संग्रहित छायाचित्र.

उस्मानाबादः ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Strike) सरकारने तोडगा काढूनही आंदोलनाची धार कमी झालेली नाही. सरकारच्या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर आले. मात्र, आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे काहीही चालत नसून, शनिवारी उस्मानाबाद आगारात तर कर्तव्यावरील कंडक्टर चक्क बेशुद्ध पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

आंदोलनात फूट

एसटी आंदोलन आता चिघळले असून, त्यात फूट पडलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे राज्यातल्या अनेक भागातील कर्मचारी सरकारने केलेली वेतनवाढ मान्य करत कामावर येताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यात तर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलील अधीक्षक सचिन पाटील यांनी संरक्षण देणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात आज अनेक कर्मचारी कामावर आले. मात्र, या कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना आंदोलन करणारे कर्मचारी विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे आज एकच गोंधळ निर्माण झालेला दिसला.

दबाव असहाय्य

उस्मानाबाद आगारात अनेक कर्मचारी कामावर आले आहेत. त्यांनी आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली आहे. त्या कर्मचाऱ्यांना आंदोलक विरोध करत आहेत. उस्मानाबाद आगारातून एक बस उमरगा येथे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरलाही कामावर जाण्यासाठी त्यांनी विरोध केला. हा गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप इतके वाढले की कर्तव्यावर असणाऱ्या कंडक्टरला हा ताण सहन झाला नाही. त्यामुळे तो बेशुद्ध पडला.

कर्मचारी आक्रमक

कर्तव्यावर आलेल्या कर्मचारी गोंधळामुळे बेशुद्ध पडल्याने तणाव निर्माण झाला होता. काही कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी काही काळ घोषणाबाजी केली. मात्र, अजूनही कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. विशेषतः सरकारच्या पगारवाढीमुळे आता विलीनीकरणाची मागणी करणारे कर्मचारी आणि कामावर येणारे कर्मचारी यांच्यामध्ये येणाऱ्या काळात खटके उडायची शक्यता आहे. सरकारने कर्मचाऱ्यांमध्ये भांडण पेटवले, असा आरोप अनेक ठिकाणी होत आहे.

कारवाईचा इशारा

दुसरीकडे परिवह मंत्री अनिल परब यांनी कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जे कर्मचारी कामावर येतील, त्यांना रुजू करून घेतले जाईल. ज्यांचे निलंबन केले आहे, ते रद्द करण्यात येईल. मात्र, याउपरही जे कर्मचारी आंदोलन सुरू ठेवतील, त्यांना जबर किंमत मोजावी लागेल. त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा परब यांनी दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही प्रचंड चलबिचल सुरू आहे. अनेक जण कामावर येताना दिसत आहेत.

इतर बातम्याः

पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

Photo: क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा 12 फुटी भव्य पुतळा!

Published On - 1:38 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI