
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. लोणीमध्ये आज शेतकरी मेळाव्यात त्यांनी सहकार विषयावर भाषण केले. त्यावेळी राज्यातील अतिवृष्टीच्या मुद्दालाही त्यांनी हात घातला. त्यानंतर सहकार चळवळीतील आठवणी ताज्या केल्या. त्यासोबतच सहकार खात्यातील बदलाविषयीची माहिती दिली. तर या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. त्यांनी विरोधकांवर जहाल टीका केली. औरंगजेबाचे नाव घेत त्यांनी विरोधकांच्या बोटचेप्या धोरणावर प्रहार केला.
औरंगजेबाच्या पाईकांमध्ये कुठे तितका दम
“मला खूप चांगलं वाटतं आहे की, या भूमीला, या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव देण्यात आले आहे. जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा भाजपा-सेना सरकारने औरंगाबादचे नाव बदलले आणि इथे सुद्धा बदल केला. या जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव दिले. हे तेच लोक करु शकतात, जे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. अनुयायी आहेत. जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात इतकी हिम्मत नाही की औरंगाबदाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने ठेवतील.” असा प्रहार अमित शाह यांनी विरोधकांवर केला.
तीन शहरांच्या नावात बदल
महायुती सरकारच्या काळात औरंगाबाद,उस्मानाबाद आणि अहमदनगर या तीन शहरांच्या नावाच्या बदलाचा प्रस्ताव समोर आला. अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर या नावाने या शहरांचे नामाकरण करण्यात आले. 13 मार्च 2024 रोजी राज्य सरकारने अहिल्यानगर नावास मान्यता दिली होती. तर केंद्र सरकारने 4 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या शहरांची नावं बदलण्यात आली होती.
स्वदेशीचा नारा
अहिल्यानगरमधील लोणीमधील सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वदेशीचा नारा दिला. कोणतीही परदेशी वस्तू खरेदी करणार नाही असा संकल्प केला तर 2047 पूर्वी भारत विकसीत देश होईल. 140 कोटी लोकांचं ही बाजारपेठ आहे. जगातील कंपन्यांना देशात यावे लागेल. येथे उत्पादन तयार करावं लागेल. पण या 140 कोटी लोकांना स्वदेशी वस्तू खरेदी कराव्या लागतील. देशातील व्यापाऱ्यांनी पण स्वदेशी वस्तूंना चालना द्यावी असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.