Indurikar Maharaj | इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी कमी होईनात, कोर्टाचा पोलिसांना महत्त्वाचा आदेश
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात कोर्टात पुन्हा खटला सुरु झालाय. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इंदोरीकर महाराज कोर्टाच्या आजच्या (13 ऑक्टोबर 2023) सुनावणीत हजर राहिले नाहीत. त्यामुळे कोर्टाने पोलिसांना महत्त्वाचा आदेश दिलाय.

कुणाल जायकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 13 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायालयात आज पहिली सुनावणी पार पडली. इंदोरीकर महाराज यांच्यावर PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय. त्यांनी कीर्तनातून अपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच प्रकरणी संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायालयात आज सुनावणी पार पडली. पण इंदोरीकर महाराज हेच सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय. कोर्टाने यावेळी पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले.
इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात खटला सुरु आहे. इंदोरीकर महाराज यांना या सुनावणीसाठी हजर राहणं अपेक्षित होतं. पण ते आजच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत. यावेळी न्यायालयाने पोलिसांना याविषयी माहिती विचारली. तर पोलिसांनी आपण इंदोरीकर महाराजांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण इंदोरीकर महाराज न भेटल्याने त्यांना समन्स देता आलं नाही, असा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात दिला.
पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना पुन्हा समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 नोव्हेंबर 2023 ला होईल, असं कोर्टाने स्पष्ट केलंय. या सुनावणीला इंदोरीकर महाराज खरंच प्रत्यक्ष हजर राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
इंदोरीकर महाजारांनी कीर्तनात पुत्रप्राप्तीबाबत एक वक्तव्य केलं होतं. संबंधित प्रकार 2020 मध्ये समोर आला होता. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी वकील रंजना गंवादे यांनी तक्रार केली होती. त्यांनंतर संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्यावेळी या न्यायालयाने गुन्हा रद्द न करण्याचा आदेश दिला होता. याविरोधात इंदोरीकर महाराजांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला होता.
संगमनेर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका रंजना गंवादे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल फेटाळत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित प्रकरणाची संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी घेण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर आज सुनावणी पार पडली.
याचिकाकर्त्यांची महत्त्वाची मागणी
फिर्यादी तथा वकील रंजना गंवादे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केलाय. मूळ फिर्यादीचं म्हणणं ऐकल्याशिवाय जामिनावर निर्णय घेऊ नये, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करा, समन्स बजावण्यासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय.
