
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. काही पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. तसेच काही पक्ष युतीसाठी चर्चा करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी युती करणार असल्याची चर्चा रंगली होती, मात्र आता दोन्ही पक्षांची युतीची चर्चा थांबली असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील या युतीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
पुण्यातील शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीबाबत बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक पर्याय आहेत, निवडणूक लढवण्याच्या संदर्भात आणि कोण कोणत्या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवणार हा सर्वस्वी अधिकार हा अजित पवार यांना आहे आणि ते निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा होत आहे.’
पिंपरी चिंचवडचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटले की, ‘अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची बैठक झाल्याचं कळलं. त्यांची काय चर्चा झाली माहीत नाही. अजित पवारांना भेटलो तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आपापल्या चिन्हावरच लढायचं. काँग्रेसने स्पष्ट सांगीतलं आहे की अजित पवार सोबत असतील तर आम्ही सोबत येणार नाहीत, मात्र मी त्यांची मन धरणी करणार आहे. आमचा पक्ष आहे आम्ही आमच्या चिन्हावर च निवडणूक लढणार आहोत. भाजपला थांबावायचं असेल तर मतांची विभागणी होऊ नये म्हणून एकत्र लढावं लागणार आहे. हा भाजप विरुद्ध लढा आहे. आमची महाविकास आघाडी तुटणार नाही.’
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी, ‘पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे, महाविकास आघाडी सोबत लढा. आपण साडे तीन वर्ष महाविकास आघाडीत आहोत. पुण्यात आता आम्ही महाविकास आघाडीत लढणार, अजित पवारांसोबत जाणार नाही’, अशी भूमिका जाहीर केली आहे.