दोन्ही भाऊ एकत्र आले तर…, ठाकरे बंधूंच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
आज राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी या भेटीनंतर एक ट्विट केलं आहे, ज्या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. राज ठाकरे तब्बल सहा वर्षानंतर मातोश्रीवर गेले, यापूर्वी 2019 ला राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. या भेटीवर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ठाकरे बंधूंच्या या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले, याकडे कसं बघता? असा प्रश्न यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं की, या भेटीकडे खूप चांगलं बघतो, तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे, त्यांचे विचार स्वतंत्र आहेत , भावा भावांनी काय करावं ? तुम्ही आणि तुमचा भाऊ वेगळे राहिलात आणि वीस वर्षानंतर एकत्र आले, तर वाईट वाटायच कारण काय? आनंदच वाटला पाहिजे, असं अजित पवार यांनी या भेटीवर बोलताना म्हटलं आहे.
राज्यात हिंदींच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिलीपासून हिंंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनाची होती, मनसेनं या विरोधात मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. दबाव वाढल्यानं अखेर सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जीआर रद्द केले.
जीआर रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या विजयी मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यापपीठावर आले, त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा सुरू झाली, त्यातच आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
