महायुतीला घाम फुटला, शरद पवारांसोबतच्या युतीवर अजित दादा म्हणाले निवडणुकीनंतर…
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? टीव्ही ९ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे. बजेट आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर यावर निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात एकीकडे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. तर दुसरीकडे राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? अशी एकच चर्चा रंगली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट केली. टीव्ही ९ मराठीच्या निखिला म्हात्रे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवार यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. त्यावेळी अजित पवारांनी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, असे मोठे विधान केले आहे.
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ
यावेळी अजित पवारांना थेट दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी बेधडक उत्तर दिले. मी या विषयावर आताच भाष्य करणार नाही. राज्याचे बजेट आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पार पडू द्या, मगच मी यावर सविस्तर बोलेन, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच बॅनरवर शरद पवार यांचे फोटो आणि बदललेली राजकीय भाषा यावरही अजित पवारांनी भाष्य केले. सध्या आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जात आहोत. जर आम्ही एकत्र असूनही टोकाची भूमिका घेत राहिलो, तर जनता आम्हाला वेड्यात काढेल. काळानुसार भाषणांमधील तीव्रता कमी होते. मागची भाषणं काढली तर अनेकांनी एकमेकांवर टीका केली आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.
शरद पवार गटासोबत युती करणार का?
शरद पवार गटासोबत एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. असा कोणताही निर्णय एकट्या अजित पवारचा नसतो. आमच्यासोबत असलेले आमदार, नेते आणि कार्यकर्ते या सर्वांच्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आणि सर्वांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतेवर अजित पवार यांनी खोचक उत्तर दिले. आत्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं का? ही म्हण वापरत त्यांनी सध्या असा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सूचित केले. सध्या आमचं पूर्ण लक्ष केवळ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर आहे. गेल्या नऊ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या का? त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी म्हटले.
