तो प्रश्न विचारताच अजितदादांचा काढता पाय, म्हणाले, याच्यामुळे मी…
अजित पवार यांनी भरत गोगावले यांच्यावरच्या व्हायरल व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माऊली पालखी सोहळ्यातील विश्वस्त वादावर ते म्हणाले की शासन नियंत्रण ठेवण्याचे काम करते. पावसाळी अधिवेशनाबाबत त्यांनी माहिती दिली आणि महायुतीतील पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येतील असेही सांगितले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरी अघोरी पूजा सुरु असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केले. या मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माऊली पालखी सोहळ्यातील विश्वस्त वादावर शासनाची भूमिका स्पष्ट केली. तसेच आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भातही त्यांनी माहिती.
सरकार आपले काम करत राहील
माऊली पालखी सोहळ्यातील विश्वस्त वादाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “शासन आपली भूमिका बजावत असते. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे आणि आम्ही केवळ यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. शासनाचे वेगवेगळे विभाग यात आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात.” यासंदर्भात मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख व्यक्तींसोबत महत्त्वाची बैठक झाली असून, सरकारी यंत्रणांनी आपले काम चोख बजावले आहे. १४०० दिंड्यांना प्रत्येकी २०,००० रुपये देण्यात आले आहेत. तसेच विविध ग्रामपंचायतींना खर्च करण्यासाठी अनुदान दिले आहे. पुणे महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने, त्यांनी आपले काम करावे आणि सरकार आपले काम करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळी अधिवेशनासाठी उद्यापासून बैठका
“मी आज मतदान संपल्यानंतर मुंबईला किंवा जिथे जायचं आहे तिथे जाईल. सोमवार, मंगळवार, बुधवार हे तीन दिवस ते मुंबईत असतील. ३० जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी त्यांच्या उद्यापासून बैठका सुरू होणार आहेत. वित्त विभाग म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे, असे अजित पवारांनी सांगितले.
भरत गोगावलेंबद्दल काय म्हणाले?
यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर अजित पवारांनी नो कॉमेंट्स असे म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले. यानंतर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, तिन्ही पक्ष (महायुती) एकत्र बसून यावर निर्णय घेतील. तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याविषयी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी त्यावर उत्तर देण्यास टाळले. याच्यामुळे मी तुम्हाला बोलत नाही, अस म्हणत अजित पवारांनी माध्यमांपासून काढता पाय घेतला.