अंबरनाथमध्ये चाललंय काय? तोंडाला मास्क लावून आले, तब्बल 16 वेळा तलवारीने सपासप वार… सीसीटीव्ही फुटेज पाहून महाराष्ट्र हादरला
या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन हल्ला केला. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.

Ambernath Attack : अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. तसेच कार्यालयात काम करणारा एक कर्मचारी जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. राजू महाडिक यांच्या कार्यालयात घुसणाऱ्या हल्लेखोरांनी तब्बल १६ वेळा तलवारीने वार केले.
नेमकं प्रकरण काय?
रोहित महाडिक यांचे अंबरनाथ पूर्वेकडील बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ कार्यालय आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले १० ते १२ हल्लेखोर त्यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी प्रथम तलवारीने कार्यालयाच्या काचा फोडल्या. यानंतर त्यांनी कार्यालयात प्रवेश करून एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला. तसेच कार्यालयातील खुर्च्यांचीही तोडफोड केली.
या संपूर्ण हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अवघ्या २३ सेकंदात हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला.
पोलिसांकडून कसून शोध सुरु
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून हल्लेखोर कोणत्या मार्गाने पसार झाले याचा शोध घेतला जात आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत. सध्या अंबरनाथ पूर्व, पश्चिम, बदलापूर आणि उल्हासनगर गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी सुरू केली असून हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
