
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीने शानदार विजय मिळवला होता. या विजयानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आज महायुती सरकारच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे महायुतीच्या आणि खासकरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला डिवचलं आहे. अमित शाह हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा टोला सपकाळ यांनी भाजपला लगावला आहे. सपकाळ यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, ‘केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कोणासोबत युती करायची ते अमित शहा ठरवतात, पालक मंत्री कोण याचा सुद्धा निर्णय ते घेतात. देवेंद्र फडणवीस हे नामधारी मुख्यमंत्री आहेत. या सरकारने वर्षपूर्तीमध्ये काहीही केलं नाही.’
पुढे बोलताना सपकाळ यांनी म्हटले की, ‘राज्यात गुन्हेगारी वाढत आहे, त्यावर मंत्र्यांचे उत्तर हास्यास्पद असते. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सगळ्यात लाचार सरकार आहे. महाराष्ट्रात टोळी युद्ध सुरू आहे. पुढच्या वर्षात तरी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीला लागले आहे, त्यामुळे केंद्र सरकार कडून त्यांनी निधी आणावा. औरंगजेब जसा क्रूर कर्मा होता तशी स्थिती दिसते. पुढच्या कालावधीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. वैयक्तिक शुभेच्छा नाहीत, लोकांच्या हितासाठी शुभेच्छा आहेत.’
याच पत्रकार परिषदेला विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. त्यांनी म्हटले की, वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक प्रश्न समोर येत आहेत. लाडक्या बहिणींपासून लाडक्या कंत्राटदार पर्यंत पोहचले आहेत. अनेक कंत्राटदारांना कोट्यवधींची कामे देत खैरात वाटली. महाराष्टात यांनी कोणते दिवे लावले, शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना मदती संदर्भात प्रस्ताव आला नाही असं केंद्रीय मंत्री सांगतात. मग कोण खोटं बोलत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.