एवढं होऊनही मंत्री कोण असेल हे अजित पवार ठरवणार का ? हे खूप चुकीचं.. अंजली दमानिया आक्रमक
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या वादाच्या भोवऱ्यात असून नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या वादग्रस्त विधानांनंतर आणि वागण्यानंतरही कोकाटे यांच मंत्रीपद जाणार नाही तर फक्त खातेबदल होऊ शकतो अशी चर्चा आहे. यावरून अंजली दमानिया संतापल्या आहेत.

वाट्टेलं ती वक्तव्य करून, कधी शेतकऱ्यांबद्दल असंवदेनशील बोलून, कधी सभागृहात कामकाज सुरू असतानाच पत्ते खेळून, सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अखेर त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये गेल्या काही वेळेपासून दोघांची बैठक सुरू असून अजित पवार यांनी कोकाटे यांचे कान चांगलेच टोचल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना कोकाटे मात्र सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळतात असा आरोप आहे. भरीस भर म्हणज पत्रकार परिषद घेऊन आपण पत्ते खेळलोच नाही, मी राजीनामा का द्यावा कोणाचा विनयभंग केला का , असे सवाल उन्मत्तपणे कोकाटे विचारतात. अशा या कोकाटेंचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधक आणि जमसामान्यांकडून सातत्याने दबाव वाढत आहे. मात्र असे असतानाही अजित पवार हे कोकाटे यांचा राजीनामा घेणार नाहीत, फार फार तर त्यांचा खातेबदल होऊ शकतो, अशी माहिती समोर येत याहे.
अंजली दमानिया संतापल्या
आणि हाच मुद्दा समोर ठेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परखडेपणे भाष्य केले असून ही काही लोकशाही आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला . लोकशाहीमध्ये लोकांना जे पाहिजे ते झालं पाहिजे. अजित पवार यांना जे वाटतं ते होण गरजेचं नाही. पण धनंजय मुंडे असोत की माणिकराव कोकाटे, दादा (अजित पवार) यांना जे हवं ते होते, ही काही लोकशाही आहे का ? धनंजय मुंडेच्या वेळेस लोकं आक्रोश करत होते, रस्त्यावर आले, त्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी त्यांच्यावर कारवाई झाली. आता कोकोटे यांच्याबाबतीतही तेच, शेतकरी आक्रोश करत आहेत, शेतकरी संघटना लिहीत आहेत, माध्यमं दाखवत आहेत एवढं होऊनही आता तिथे मंत्री कोण असेल हे आजित पवार ठरवणार का ?मला हे अतिशय चुकीच वाटतंय. राईट टू रिकॉल हा कधीही करता आला पाहिजे. एखादा व्यक्ती जर परफॉर्म करत नसेल, तर राईट टू रिकॉलप्रमाणे त्याला परत बोलावलं गेलं पाहिजे, पण आत्ताच्या घटकेला हे होत नाही. मंत्र्यांचा पक्ष किंवा मुख्यमंत्री निर्णय ठरवतात, हे साफ चुकीचं आहे. लोकशाही कोण मंत्री होणार आणि कोण नाही, हे लोकांनी ठरवलं पाहिजे, असा पुनरुच्चार अंजली दमानिया यांनी केला.
हे तर सरकारचं अभय
कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदललं गेलं तर एकप्रकारे अशा वर्तनाला सरकारचं अभय मिळतंय असंच म्हणावं लागेल. एक नाही चार वेळा त्यांची वादग्रस्त विधानं समोर आली. ओसाड गावची पाटीलकी, ज्यांना ते मंत्रीपद वाटतं अशा व्यक्तीला तिथे ठेवणं, तिथून काढून त्यांना मदत आणि पुनर्वसन खातं दिलं गेलं तर तिथेही ही व्यक्ती तेच काम करणार आहे. बदल काय होणार ? त्यांना त्यांच्या सोयीची, गणित बघून जे केलं जातंय ना ते पाहून मला प्रचंड राग येतोय, ही लोकशाही नक्कीच नाही असं दमानिया म्हणाल्या.
