12th Exam: बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एकदम सोप्पी, थेट भोग्यांवरून उत्तरं सांगितली, कुठं घडला प्रकार?
12th Board Exam Answer announced Through Speaker: सध्या इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीची परीक्षा सुरू आहे. पेपर फुटीचे प्रकार समोर आले असतानाच आता अजून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी थेट भोग्यांवरून परीक्षेची उत्तरं देण्यात आली.

ज्ञानेश्वर लोंढे/ प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे बारावी परीक्षेदरम्यान भोंग्यावरून उत्तर सांगितल्याचा प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र, इतिहासाच्या परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरे थेट भोंग्याद्वारे, स्पीकरद्वारे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. बुधवारी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. स्व. संगीतादेवी उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा येथील परीक्षा क्रमांक २०७ वर हा प्रकार घडला. या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (12th Board Exam Answer announced Through Speaker) दाखल करण्यात आला. लातूर शिक्षण मंडळाने प्रकरणात संस्थेकडून लेखी खुलासा मागितला आहे. संस्थेला नोटीस दिल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुपमा भंडारी यांनी दिली आहे.
भोंगा लावून सांगितली उत्तरं
या परीक्षा केंद्राच्या भिंतीलगत प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे. या इमारतीरून अज्ञात व्यक्तीने भोग्यातून विद्यार्थ्यांना उत्तरं सांगितली. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं यावेळी सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र संचालक सुखदेव थोरात यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लागलीच सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायदा १९८२ च्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
उत्तरं सांगितली, पण प्रश्नपत्रिका पुरवली कोणी?
सध्या हा प्रकार पंचक्रोशीत चर्चेत आला आहे. इयत्ता बारावीसाठी हा सामूहिक कॉपीचा,मास कॉपीचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने जी उत्तर सांगितली, ती प्रश्नपत्रिका पाहूनच सांगितली. ही प्रश्नपत्रिका त्या व्यक्तीला पुरवली कोणी, याबाबत मात्र अनेकांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे ही मिलीभगत कोणाच्या सहाय्याने करण्यात आली असा प्रश्न विचारल्या जात आहे. या परीक्षा केंद्रावर बाहेरील व्यक्तींचा वावर असल्याचे म्हटले जात आहे. परीक्षा केंद्र संचालकांनी तक्रारीत ही बाब मांडली आहे.
दोन परीक्षार्थीवर कारवाई
नायगाव तालुक्यातील नरसी येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी भेट दिली. त्यावेळी एक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळला. या विद्यार्थ्यावर मंडळाच्या नियमानुसार पुढील कारवाई करण्यात आली. तर नायब तहसीलदार अरुणा सूर्यवंशी यांनी माहूर येथील जगदंबा उच्च माध्यमिक विद्यालयात अचानक भेट दिली. त्यावेळी एक परीक्षार्थी गैरप्रकार करत असल्याचे समोर आले. त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.
