शेतकरी, संस्थांकडून पाणी वापरासाठी मागवले अर्ज; नाशिक पाटबंधारे विभागाकडे साधा संपर्क

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि संस्थाकडून पाणी वापरासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शेतकरी, संस्थांकडून पाणी वापरासाठी मागवले अर्ज; नाशिक पाटबंधारे विभागाकडे साधा संपर्क
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि संस्थाकडून पाणी वापरासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकक्षेतील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर या तालुक्यांतील जलाशय, नदीनाले, कालवा या लघु प्रकल्पांमधून प्रवाही, उपसा व ठिबक सिंचन पद्धतीने रब्बी हंगाम 2021-22 करिता पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी पाण्याचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज 10 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अ. रा. निकम यांनी केले आहे.

उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ठराविक क्षेत्रापर्यंत नमुना नंबर 7 प्रवर्गात रब्बी हंगाम 2021-22 संरक्षित सिंचनाकरिता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या उभ्या पिकांसाठी हंगामी भुसार, फळबाग, बारमाही उभ्या पिकांसाठी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळा हंगाम अखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून उर्वरित पाण्याचा शेतीच्या पिकांसाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरवठा करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा सुलभ व्हावा यासाठी मंजूर क्षेत्रातील उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने घ्यावे. तसेच ज्या लाभार्थ्यांना नमुना नंबर 7 वर ज्यांना पाण्याचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी अर्जासोबत सध्याचा वैध 7/12 उतारा जोडणे बंधनकारक आहे. तसेच सहकारी पाणी वापर संस्थेस तिच्या लागवडीखालील क्षेत्राच्या प्रमाणात स्वतंत्ररित्या पाणी कोटा मंजूर करण्यात आला असून, या संस्थांच्या वापर लाभक्षेत्रातील कोणत्याही वैयक्तिक लाभ धारकाला नमुना नंबर 7 वर पाणी पुरवठा केला जाणार नाही. त्याकरीता सहकारी पाणी वापर संस्थेतील लाभधारकांनी संस्थेकडेच पाणी मागणी नोंदविणे आवश्यक असल्याचेही कळविण्यात आले आहे.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वापर करतांना सुक्ष्म सिंचनावर भर देवून, रब्बी हंगाम मंजूर क्षेत्राच्या नादुरूस्त असलेल्या पोटचाऱ्या लोक सहभागातून ताबडतोब दुरुस्त करुन घ्याव्यात, नादुरुस्त पोटचाऱ्यांमुळे पाणी पुरवठ्यास अडथळा निर्माण होऊन, पिकांचे नुकसान झाल्यास तसेच उपलब्ध पाणीसाठ्या नुसार आवर्तन कालावधीमध्ये कमी जास्त अंतराने पाणीपुरवठा झाल्याने पिकांचे काही अपरिहार्य कारणाने पाणी कमी मिळून नुकसान झाल्यास त्याबाबत शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

ज्यांच्या नावाचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे व ज्यांच्याकडे थकबाकी आहे अशा लाभार्थ्यांना मंजुरी दिली जाणार नाही. तसेच कालव्यावरील मंजूर उपसा धारक व्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रीक मोटारी, ऑईल इंजिन ठेवून अथवा पाईप लाईनव्दारा पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये, असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही केली जाईल.
– अ. रा. निकम, उपकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, नाशिक

इतर बातम्याः

लसीकरणाचा विक्रमः नाशिक विभाग राज्यात नंबर 1; एक कोटी पावणेपंधरा लाख डोस टुचुक!

तू सफर मेरा, है तू ही मेरी मंज़िल…सोनं पुन्हा महाग होतंय, जाणून घ्या नाशिकमधले भाव!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI