मुंबईः केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigative Agencies) एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावरचं दिल्लीचं आक्रमण आहे. पण महाराष्ट्र अशा कारवायांसमोर झुकणार नाही, थांबणार नाही, असा पलटवार शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध शिवसेना वातावरण चांगलंच तापलं आहे. परस्परांवर आरोप प्रत्यारोप, अटकसत्र, धाडसत्र सुरु आहेत. याच मालिकेत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा मारला. या विषयावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणून घेतली. तेव्हा त्यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.