प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराची मालकी कुणाची? देवालयाचा वाद न्यायदेवतेच्या दारात, काय आहे नेमकं प्रकरण?

प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराची मालकी कुणाची? देवालयाचा वाद न्यायदेवतेच्या दारात, काय आहे नेमकं प्रकरण?
प्रसिद्ध देवस्थान घृष्णेश्वर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि मालमत्तेवरून वाद पेटला आहे. मंदिर आणि मंदिराच्या 13 एकर 2 गुंठे मालमत्तेच्या मालकी हक्कात नाव दाखल करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 05, 2022 | 7:05 AM

औरंगाबादः बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि मालमत्तेवरून वाद पेटला आहे. मंदिर आणि मंदिराच्या 13 एकर 2 गुंठे मालमत्तेच्या मालकी हक्कात नाव दाखल करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. सदर जमीन आपल्या पूर्वजांना अहिल्याबाई होळकरांनी दिलेली होती, असा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. आता कोर्टात यावर काय न्यायनिवाडा होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काय आहे नेमका वाद?

घृष्णेश्वर मंदिराची 13 एकर आणि मंदिर परिसरातील 2 गुंठे जमिनीचा हा वाद आहे. 1960 मध्ये केंद्र सरकारने पुरातत्त्व सर्वेक्षण विभागास दिली होती. तेव्हापासून पुरातत्व विभाग या वास्तूची देखभाल व सुरक्षा करीत आहे. मंदिराच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी नेमलेले आहेत. त्यांना या विभागामार्फतच वेतन दिले जाते.
मात्र येथील पुजारी पुराणिक यांच्या मते, सदर इनामी जमीन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबियांनी दान केलेली आहे. त्यामुळे मालकी हक्कात आपले नाव घ्यावे, अशी विनंती त्याने न्यायालयात केली आहे.

गॅझेट, सातबारा आणि इतर हक्क्कांचा घोळ

1960 मध्ये प्रसिद्ध झालेल्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये भारत सरकारने संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाला सोपवली आहे. हे मंदिर खुलताबादच्या तहसीलअंतर्गत येते. येथील कार्यालयाने 2010 मध्ये पुरात्त्व विभागाचे नाव सातबाऱ्यावर घेतले. तर पुजारी रवींद्र प्रल्हादराव पुराणिक यांचे इतर हक्कात नाव घेतले.

जिल्हा न्यायालयाला पुजाऱ्याचा हक्क मान्य

अहिल्याबाई होळकर कुटुंबियांनी ज्याला जमीन दान केली, त्यास पुत्र नसल्याने पुत्र दत्तक घेतला. संबंधित दत्तक पुत्रानेही पुढे दत्तक पुत्राकडे हा वारसा सोपवला. पुजारी पुराणिकदेखील दत्तक पुत्र असल्याचे पुरातत्त्व खात्याने स्पष्ट कले आहे. मात्र पुराणिक यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथे मालकी हक्कासाठी दावा केला तसेच जिल्हा न्यायालयातही दावा केला, तेव्हा या दोन्ही ठिकाणी मंदिर आणि जागेवर त्यांचा मालकी हक्क मान्य करण्यात आला. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुजारी मंदिरावर किती खर्च करतात?

घृष्णेश्वर मंदिराच्या मालकी हक्क खटल्याच्या सुनावणीप्रसंगी न्यायालयात पुरातत्त्व खात्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. पुजारी पुराणिक हे मंदिरावर किती खर्च करतात, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे म्हटले गेले. यावर खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील यांनी प्रतिवादी पुजाऱ्यास नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेवर 3 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

बातम्या-

मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, काँग्रेस म्हणते, निर्णय चांगला, पण…

मुंबईत कोरोनाचा कहर; रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, आरोग्य यंत्रणा सर्तक


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें