औरंगाबादच्या सफारी पार्कभोवती उभी राहतेय संरक्षक भिंत , ‘सिद्धार्थ’चे प्राणीसंग्रहालय इथेच स्थलांतरीत होणार

औरंगाबादच्या सफारी पार्कभोवती उभी राहतेय संरक्षक भिंत , 'सिद्धार्थ'चे प्राणीसंग्रहालय इथेच स्थलांतरीत होणार
औरंगाबादमधील प्रस्तावित सफारी पार्कभोवतीच्या संरक्षक भिंतीच्या कामाला वेग

औरंगाबाद: शहरातील जगप्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानातील (Siddharth Garden and Zoo) प्राणीसंग्रहालय हे देशो-देशीच्या पर्यटकांचे तसेच औरंगाबादकरांचेही आकर्षणाचे आणि लाडके ठिकाण आहे. मात्र दिवसेंदिवस येथील प्राण्यांची संख्या वाढत असल्याने, उद्यानाची जागा आता अपुरी पडत असल्याचे मत केंद्रीय प्राणिसंग्रालय प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. सिद्धार्थ उद्यानातील अपुऱ्या जागेवर या पथकाने आक्षेपही घेतला होता. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिकेने मिटमिटा येथील 300 एकर जागेवर भव्य सफारी पार्क उभारण्याचे आयोजिले आहे. या पार्कभोवतीची उंच भिंत उभारली जात आहे. तिचे कामही वेगात सुरु आहे.

12 फूट उंच, 4 किलोमीटर लांब संरक्षक भिंत

मिटमिटा येथील जागेत ओपन सफारी, लियोपार्ड किंवा टायगर सफारी पार्क उभारण्यात येईल. दरम्यान, नियोजित पार्कच्या जागेभोवती भव्य संरक्षण भिंत उभारणीचे काम सुरु आहे. ही भिंत तब्बल 4 किलोमीटर लांब असून 12 फूट उंचीची आहे. या कामावर स्मार्ट सिटीतून जवळपास 11 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सध्या 1.3 किलोमीटरची भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.

दिल्ली प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांचा आराखडा

सफारी पार्क उभारण्यासाठी दिल्ली येथील प्राणिसंग्रहालयाचे माजी संचालक बी.आर. शर्मा यांच्या एजन्सीची पीएमसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमसीने मिटमिटा येथील सफारी पार्कचा प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्रीय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर केला. मात्र केंद्राने या आराखड्यात त्रुटी काढल्या. त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर आराखड्यास सहा महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली. या प्रक्रियेनंतर सफारी पार्कसाठी आणखी अतिरिक्त 58 हेक्टर जमिनीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करण्यात आला. सफारी पार्कसाठी स्मार्ट सिटी योजनेतून 147 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. सफारी पार्कचे काम तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात शंभर एकर जागेचे सपाटीकरण आणि संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु झाले आहे.

सिद्धार्थ उद्यान ते सफारी पार्क

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला असलेले सिद्धार्थ उद्यान आणि तेथील प्राणीसंग्रहालय हे मराठवाड्यातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या असंख्य सहली येथे येत असतात. प्राणी संग्रहालयातील पांढरे आणि पिवळे वाघ हे प्राणीप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतात. विशेष म्हणजे सिद्धार्थ उद्यानातील वातावरण वाघांसाठी पोषक असल्यामुळे येथील वाघांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र प्राणी संग्रहालयातील जागा सगळ्याच प्राण्यांना अपुरी पडत असल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने येथील प्राणिसंग्रहालयावर आक्षेप घेतला होता. त्यामुळेच हे प्राणीसंग्रहायल मोकळ्या व प्रशस्त जागेवर हलवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. त्यानुसार हे प्राणीसंग्रहालय मिटमिटा येथील 300 एकरावरील मोकळ्या जागेत स्थलांतरीत होण्याचे प्रस्तावित आहे. (construction of 4 km long compound of Safari Park Aurangabad get speed)

इतर बातम्या

Aurangabad Top 5: औरंगाबाद शहरामधील महत्त्वाच्या पाच बातम्या, वाचा मोजक्या शब्दात, कमी वेळात!

Aurangabad Gold: सोने-चांदीत घसरणीचाच ट्रेंड, पितृपक्षामुळे ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ, वाचा औरंगाबादचे भाव

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI