डॉ. शिंदे खून: क्लू मिळेना, निकटवर्तीयांवर दाट संशय, पोलिसांनी मांडले ठाण, प्रश्नांच्या फैरी, हत्येसाठीची शस्त्रे कुठे पुरली?

डॉ. शिंदे खून: क्लू मिळेना, निकटवर्तीयांवर दाट संशय, पोलिसांनी मांडले ठाण, प्रश्नांच्या फैरी, हत्येसाठीची शस्त्रे कुठे पुरली?
डॉ. शिंदे खून प्रकरणी हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कुठे पुरली,याचा तपास अजूनही सुरूच आहे.

औरंगाबाद: शहरातील डॉ. राजन शिंदे (Dr. Rajan Shinde) यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलीस पथकाला अजूनही यश आलेलं नाही. मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजन शिंदे यांची रविवारी मध्यरात्री क्रूर हत्या झाली. मंगळवारी घाटी रुग्णालयात त्यांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले. त्यात मारेकऱ्याने डॉ. शिंदेंवर हल्ला करताना दोन हत्यारांचा वापर केल्याचे म्हटले आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय असलेल्या शिंदेंच्या हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिस दलासमोर उभे राहिले आहे. सोमवारी सायंकाळी शिंदेंच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी दिला. शाेकाकुल वातावरणात लोकांच्या भावना तीव्र होत्या. शिंदेंच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा घोषणा त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार, संघटनेच्या सदस्यांनी दिल्या. त्यानंतर रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकासह गुन्हे शाखा, मुकुंदवाडी पोलिस (Mukundwadi Police) तपास करत होते.

हत्येसाठी दोन शस्त्रांचा वापर

पोलिसांना मिळालेल्या पोस्टमॉर्टेमच्या अहवालात खून किती क्रूरपणे केलाय, हे उघड झाले आहे. मारेकऱ्याने दोन हत्यारांचा वापर केला. त्यातील एक हातोडा किंवा लोखंडी रॉडसारखे होते. त्यातील लोखंडी रॉडचा एक तडाखा डोक्याच्या मागील बाजूला केला, तर कपाळावर तीन घाव घातले. हा तडाखा व घाव शक्तीनिशी डॉ. शिंदेंना प्रतिकार करणे कठीण गेले असावे. त्यानंतर मारेकऱ्याने धारदार हत्याराने त्यांचा डावा कान तीन चतुर्थांश कापला. मग गळा मणक्यापर्यंत म्हणजे दीड ते पावणेदोन इंच खोलवर चिरला. त्यामुळे डॉ. राजन यांना ओरडणेही शक्य झाले नसावे. अहवालानुसार चार ते पाच सेंटिमीटर खोलवर वार करत हाताच्या नसा कापण्यात आल्या. एखादी लोखंडी, लाकडी वस्तू कापण्यासाठी वापरले जाणारे हे धारदार हत्यार असावे. आता दोन्ही हत्यारे शोधणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.

छातीवर बसून दोन भुवयांच्यामध्ये वार

सूत्रांच्या माहितीनुसार हातोड्याच्या फटक्याने अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलेल्या डॉ. राजन यांच्या छातीवर मारेकरी काही मिनिटे बसला. छातीवर बसूनच त्याने त्यांच्या दोन भुवयांच्या अगदी अचूक मध्यभागी धारदार हत्याराने एक बारीक आकाराचा वार केला. ती जखम ठळकपणे दिसेल अशी काळजी मारेकऱ्याने घेतली असावी.

प्रश्नांचा भडीमार, जबाबात बोबडीही वळली, पण..

डॉ. शिंदे यांच्या घरात पोलिसांनी अहोरात्र ठाण मांडले आहे. संशयितांवर बारीक नजर ठेवली जात आहे. निकटवर्तीयांचीही कसून चौकशी सुरु आहे. काल दिवसभर, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आदींवर प्रश्नांच्या फैरी होत आहेत. प्रत्येकाच्या जबाबात काहीसा फरक येत आहे. पण पोलिसांच्या हाती अद्याप ठोस पुरावे सापडले नाहीत.

बाजूच्या मैदानात शस्त्रे पुरल्याचा संशय…

शिंदेंच्या एका निकटवर्तीयाची जबाबात बोबडी वळू लागली. तेव्हा त्याच्याकडून पुरावा मिळेल, अशी आशा निर्माण झाली. पथकाने तत्काळ त्याला सोबत घेतले. सायंकाळी सात वाजता पथक शिंदेंच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात गेले. तेथे काही पुरले असल्याचा दाट संशय निर्माण झाला. निकटवर्तीयाला घेरून पोलिसांनी ‘पुरावे दाखव’ असे म्हटले. पण तो निकटवर्तीय स्तब्ध झाला. प्रश्नांच्या फैरी झाडूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसही हतबल झाले.

दुसऱ्या दिवशीच पत्नीची विद्यापीठात बदलीची मागणी

दरम्यान, डॉ. शिंदे यांच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी मुलीसह विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिवांची भेट घेतली. डॉ. मनीषा या विद्यापीठाच्या उस्मनाबाद येथील उपकेंद्रात प्राध्यापिका आहेत. तेथून औरंगाबाद विद्यापीठात बदली करण्याची मागणी त्यांनी कुलगुरुकडे केली. या भेटीनंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. शिंदे यांचा खून झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने केलेल्या या बदलीच्या मागणीमागील हेतू काय असेल, या विचाराने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

इतर बातम्या-

प्राध्यापकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, औरंगाबादेत खळबळ, कुठून आलं इतकं क्रौर्य?

Aurangabad crime: आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या हाती, मोबाइल, जुगाराचे साहित्य अन् 89,300 रोख जप्त

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI