कोर्टाच्या आदेशानंतर आता बच्चू कडू पेटले, आंदोलनाचं काय होणार? स्पष्ट केली भूमिका!
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता न्यायालयाच्या आदेशानंतर कडू यांनी त्यांच्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

Bacchu Kadu Farmers Protest : शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांचे नागपूर-हैदराबाद महामार्गावर आंदोलन चालू आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. मात्र आता बच्चू कडू तसेच आंदोलकांनी सहा वाजेच्या आत आंदोलनस्थळ सोडावे. जागा रिकामी करावी, असा आदेश दिला आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर आता बच्चू कडू यांनी आंदोलकांना संबोधित करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही येथून हटायला तयार आहोत, पण आमच्या आंदोलनाची सोय करण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच आहे. आमची तुरुंगात सोय करावी, असे म्हणत आंदोलन चालूच राहील असे स्पष्ट केले आहे.
पोलीस कोर्टाचा आदेश घेऊन आले पण…
न्यायालयाने आंदोलकांनी 6 वाजेच्या आत आंदोलनाची जागा खाली करावी, असा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये पोलिसांनी बच्चू कडू यांना न्यायालयाच्या आदेशाबाबत सांगितले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी कडू यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाबाबत सांगाच बच्चू कडू यांनी उभे राहात आंदोलनाविषयीच भूमिका स्पष्ट केली.
बच्चू कडू यांनी नेमके काय सांगितले?
शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो आहोत. पण आम्हाला बाहेर काढण्यासाठी एका दिवसात आदेश निघतो. यावर विचार करण्याची वेळ आहे. लोकशाहीची हत्या न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे, अशी भावना यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही इथून हटायला तयार आहोत. पण आमच्या आंदोलनाची पोलिसांनीच व्यवस्था करावी. आम्हाला न्यायालयाचा अवमान करायचा नाही, असेही कडू म्हणाले.
आम्ही इथून हलायला तयार आहोत पण…
पुढे बोलताना बच्चू कडू यांनी आता आम्हाला तुरुंगात टाकावे आम्ही तिथेच आंदोलन करू असे सांगितले. आमची इथे थांबायची आमची मानसिकता नाही. परंतु आता सगळ्या व्यवस्था इथून कुठे न्यायची आहे, हे सांगावे. याची पोलिसांवर जबाबदारी आहे. इथून हलायला आम्ही तयार आहोत. पण प्रत्येक कार्यकर्त्याला न्यायची जबाबदारी पोलिसांची आहे, असे कडू यांनी स्पष्ट केले. आम्हाला तुरुंगात न्या आम्ही तुरुंगात जाऊन आंदोलन करू असा इशाराच कडू यांनी दिला. त्यामुळे आता या आंदोलनाबाबत पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
