“बेगडा शरद पवारांची बेगडी लेक”, लक्ष्मण हाकेंचा घणाघात, म्हणाले “त्यांच्या मतदारसंघातील हत्या…”
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र टीका केली.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. याप्रकरणी सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. तर दुसरीकडे एक आरोपी अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले. ‘मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला, तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईन, हा माझा शब्द आहे’, असे वचन सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिले. आता यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. बेगडा शरद पवारांची बेगडी लेक, अशा शब्दात लक्ष्मण हाकेंनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला
सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंबद्दल सवाल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. मी शरद पवारांना कायम बेगडी पुरोगामी नेता म्हणत आलो आहे. आता सुप्रिया सुळे त्याचा शिक्का आपल्या वर्तनातून दाखवून देतात, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
सुप्रिया सुळेंना त्यांच्या मतदारसंघातील हत्या दिसत नाही – लक्ष्मण हाके
“मी सुप्रिया ताईचे स्वागत करतो. शरद पवारांना मी कायम बेगडी पुरोगामी नेता म्हणत आलो आहे. सुप्रिया सुळे त्याचा शिक्का आपल्या वर्तनातून दाखवून देतात. त्याच सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातील उतरवली गावात विक्रम दादासाहेब गायकवाड या तरुणाची हत्या झाली. सुप्रिया सुळे यांना त्यांच्याच मतदारसंघात झालेल्या हत्या दिसत नाही”, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
“बेगडा शरद पवारांची बेगडी लेक त्यांना इतर जाती मधल्या हत्या दिसत नाहीत. सुप्रिया सुळे यांना त्यांच्याच मतदारसंघात झालेले हत्या दिसत नाही. सुप्रिया सुळे बेगडी पुरोगामी नेतृत्व आहे. सुप्रिया सुळे या दुःखद प्रसंगावर राजकारण करत आहेत”, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
“हत्येच्या आडून राजकारण करू नका”
“रोहित पवार 1000 ते 1500 मतांनी निवडून आले आहेत. पवार फॅमिलीने फक्त निवडणूक जिंकण्याचा व्याकरण आत्मसात केलेले आहे. रोहित पवार हत्येच्या आडून राजकारण करू नका. इतर हत्यांकडे हीच मंडळी का दुर्लक्ष करतात?” असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विचारला.
वाल्मिक कराड आणि मनोज जरांगे पहाटे का भेटले?
“ज्याप्रकारे वाल्मीक कराड आणि मनोज जरांगे यांची भेट झाली होती. त्याच अर्थाने ही देखील भेट झाली असावी. दोन भेटींकडे वेगळ्या भावनेने बघत नाही. मनोज जरांगेंनी वाल्मिक कराडची पहाटे का भेट घेतली?? मनोज जरांगेंची स्पेस संपली नाही. जरांगे असतानाच शून्य माणूस होता. सुरेश धस एक लोकप्रतिनिधी आहेत आणि ते एका मंत्र्याला भेटले आहेत. वाल्मिक कराड आणि मनोज जरांगे पहाटे का भेटले होते, याचे उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. सगळ्यांची मिलीभगत आहे”, असा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केला.