बीड | लहानपणापासून आईच्या अवतीभोवती खेळणाऱ्या ओंकारने आईला कांदा चिरताना (Onion) अनेकदा पाहिलं. पण मोठा झाला, सातवीत गेला तसा त्याला तिचं रडणं असह्य होऊ लागलं. हे दुःख त्याने आपल्या शिक्षकांशी (Teacher) शेअर केलं. कांदा चिरताना त्यातील रासायनिक पदार्थांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येत असेल तर आपण यावर निश्चितच उपाय शोधू शकतो, असं बोलून दाखवलं. ओंकारनं (Omkar) ही कल्पना ज्या शिक्षकांना सांगितली, ते शिक्षक विज्ञानाचे भन्नाट प्रयोग करणारे सर्जनशील व्यक्ती. मग काय जिज्ञासू वृत्तीचा विद्यार्थी आणि सर्वतोपरी मार्गदर्शन करणारा शिक्षक या दोघांच्या प्रयत्नांतून साकारला स्मार्ट चाकू. कांद्यावर चाकू मारताच त्यातून रासायनिक पदार्थ आईच्या डोळ्यापर्यंतच पोहोचू न देणारा चाकू यांनी तयार केला आणि पाहता पाहता देशासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग बनला. ही प्रेरणादायी कथा आहे, बीड तालुक्यातल्या कुर्ला गावातल्या ओंकारची.