Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : मेळाव्याआधी चॅलेंज करणाऱ्या सुशील केडीयाला मनसेने दिला मोठा दणका
Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : 'मी मराठी शिकणार नाही' अशी मुजोरीची भाषा करणाऱ्या व्यावसायिक सुशील केडियाला मराठी विजयी मेळावा सुरु होण्याच्या काहीवेळ आधी मनसेने मोठा दणका दिला आहे. केडियाने थेट राज ठाकरेंना चॅलेंज केलं होतं.

‘नोंद घ्या राज ठाकरे मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही. आता तुमचं याबाबत बेफाम गैरवर्तन पाहता मी पण प्रतिज्ञा करतो जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत. तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला…’, असं सुशील केडियाने म्हटलं होतं. विशेष म्हणजे केडियाने राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना डिवचलं होतं. सुशील केडिया मुंबईतला एक व्यावसायिक आहे. हिंदी भाषा सक्तीचा रद्द झालेला जीआर, त्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी केलेली मारहाण या पार्श्वभूमीवर मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात सुशील केडियाने ‘मी मराठी शिकणार नाही’ अशी मुजोरीची भाषा केली होती.
या सुशील केडियाला मनसेने आपल्या स्टाइलमध्ये दणका दिला आहे. आज वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा संपन्न होत आहे. हा मेळावा सुरु होण्याच्या काहीवेळ आधी मनसैनिकांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडून टाकलं. विजयी मेळाव्याला सुरुवात होण्याआधी ही मोठी घडामोड आहे.
सुशील केडिया कोण आहे?
सुशील केडिया केडियानॉमिक्स या नावाची रिसर्च फर्म चालवतात. केडियानॉमिक्स या रिसर्च फर्मचे सुशील केडिया संस्थापक आहेत. ही संस्था संपत्ती नियोजन, आर्थिक सल्ले, आर्थिक विश्लेषणाच्या सेवा पुरवते. शेअर बाजारातील गुंतवणूकदार तज्ञ अशी केडिया यांची ओळख आहे. भारतीय शेअर बाजाराचा 20 वर्षांचा अनुभव असल्याचाही त्यांचा दावा आहे.