कोकणात संघर्ष पेटणार? भर मेळाव्यात भास्कर जाधव यांची योगेश कदम यांच्याविरोधात मोठी घोषणा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, भर मेळाव्यात त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री योगेश कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आमने -सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते, त्याला प्रत्युत्तर देताना कदम यांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मेळाव्यात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
नेमकं काय म्हणाले जाधव?
योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांनी भर मेळाव्यात उमेदवारच जाहीर केला आहे. यावेळी बोलताना जाधव यांनी म्हटलं की, जेव्हढा निधी आमदार म्हणून दापोली विधानसभा मतदार संघात आणतो, त्यापेक्षा जास्त निधी यापुढे गुहागर मतदार संघात देऊ, आमदार व्हायचं आहे तर दापोली मतदार संघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असं समजा असं यावेळी भास्कर जाधव यांनी सहदेव बेटकर यांना उद्देशून म्हटलं आहे. सहदेव बेटकर हे 2019 मध्ये भास्कर जाधवांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते, मात्र आता जाधव यांनी त्यांना थेट योगेश कदम यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी रामदास कदम यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी डान्सबारवरून कदम यांच्यावर आरोप केले होते, तोच धागा पकडत जाधव यांनी पुन्हा कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी कदम यांची नक्कल देखील केली. त्यामुळे आता कदम हे भास्कर जाधव यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान यापूर्वी परब यांनी देखील कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना त्यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी देखील हल्लाबोल केला आहे, त्यामुळे कोकणात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
