रामदास कदमांची थेट श्वानाशी तुलना, भास्कर जाधवांनी थेट कुंडलीच काढली, म्हणाले भुंकल्याशिवाय…
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर ह्ललाबोल केला आहे. कदम यांची तुलना थेट श्वानाशी करण्यात आली आहे.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते रामदास कदम यांनी 2 ऑक्टोबर रोजीच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत खळबळजनक दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आला होता,
असा सवाल कदम यांनी केला आहे. कदम यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता ठाकरे यांच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. कदम यांची राजकीय वाटचाल समोर आणून भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
रामदास कदम छमछम बारवाले
एका बाजूला आम्ही शिवसेनाप्रमुखाचे भक्त आहोत, असे सांगायचे. शिवसेनाप्रमुखांचे आम्ही शिवसैनिक आहोत, असे सांगायचे आणि दुसरीकडे त्याच शिवसेनाप्रमुखांवर अश्लाघ्य टीका करायची हे योग्य नाही. रामदास कदम हे बामदास कदम आहेत. ते छमछम बारवाले आहेत. महिलांनी पैसे कमवायचे आणि आपण ते उडवायचे असे रामदास कदम यांच्याकडून केले जाते. रामदास कदम यांच्याकडून तशाच प्रकारचे उद्गार अपेक्षित आहेत, अशी थेट टीका भास्कर जाधव यांनी केली.
रामदास कदम यांची श्वानासोबत तुलना
तसेच रामदास कदम यांच्याकडून चांगले प्रबोधन, चांगले विचार अपेक्षित नाहीत. रामदास कदम यांना शिवसेनेने 32 वर्षे लोकप्रतिनिधी केले. त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त होणार नाही. कारण ही कृतघ्न माणसं आहेत, असेही भास्कर जाधव म्हणाले. रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत, आज या पक्षाच्या स्थापनेला तीन वर्षे झाली. या रामदास कदम यांना तीन वर्षांत कोणतीरी भाषण करायला बोलवलं आहे का? असा सवाल करत कदम यांना किंमत नसल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला. तसेच पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची तुलना श्वानासोबत केली. रामदास कदम यांना पक्षात किंमत नाही. म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदम यांच्यासारख्या श्वानांना कोणीही किंमत देत नाही, अशी जहरी टीका भास्कर जाधव यांनी केली.
