भिवंडीत महापौरपदासाठी काँग्रेसचा मोठा गेम… सेक्युलर फ्रंटची घोषणा, या पक्षांचा समावेश
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत महापौर पद मिळवण्यासाठी सपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'ची घोषणा केली. आमदार रईस शेख संयोजक आहेत. धर्मनिरपेक्षता, एकता आणि विकास ही फ्रंटची प्रमुख तत्वे आहेत. ४८ नगरसेवकांच्या बळावर महापौर पदासाठी त्यांनी दावा केला असून, प्रमुख नेत्यांचा पाठिंबा आहे.

महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली असून आता प्रत्येक महानगरपालिकेत महापौर पदासाठी रेस सुरू झाली आहे. निवडणुकांसाठी विविध ठिकाणी युती, आघाडी झाली होती. आता निकालही जाहीर झाले असून जास्त संख्याबळ असलेल्या पक्षांना इतर पक्षातील नगरसेवक पाठिंबा देताना दिसत आहेत. याचदरम्यान भिवंडीतील महापौरपदाचीही बरीच चर्चा असून याचदरम्यान काँग्रेसने भिवंडीत महापौरपदासाठी मोठा गेम केला आहे. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शुक्रवारी ‘सपा-काँग्रेस-राष्ट्रवादी (शप)’ या तीन पक्षांच्या ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट ’ची घोषणा केली. तसेच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचा महापौर हा ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’चा होईल, असे जाहीर केले आहे.
भिवंडी -निजामपूर महानगरपालिकेत 90नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी- शप 12 आणि समाजवादीचे 6 असे ४८ नगरसेवकांचे महापौर पदासाठी पुरेसे संख्याबळ आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादी (शप)-समाजवादी या तीन पक्षांचे नेते शुक्रवारी एकत्र आले व त्यांनी ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची घोषणा केली. या फ्रंटचे संयोजक भिवंडी पूर्वचे सपा आमदार रईस शेख हे असून काँग्रेसचे माजी आमदार रशीद मोमीन हे चेअरमन तर राष्ट्रवादी- शपचे सोहेल गुड्डू हे सहसंयोजक आहेत.
यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, भिवंडीच्या जनतेने धर्मनिरपेक्ष पक्षांना कौल दिला आहे. त्याचा आदर करत आम्ही ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन केली आहे. एकता, भाईचारा आणि विकास हा आमच्या फ्रंटचा मुलाधार आहे. भिवंडीत आता कोणीही नगरसेवक विकला जाणार नाही.
या आघाडीला सपा राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा पाठिंबा आहे, असे आमदार रईस शेख यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सपा प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी भिवंडी- निजामपूर महानगरपालिकेतील पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार आमदार रईस शेख यांच्याकडे सोपवले आहेत. तसे पत्र आमदार अबु आझमी यांनी प्रसिद्ध केले आहे.
पक्षाने विश्वासाने भिवंडी निजामपूर महानगर पालिकेत महापौर पदाच्या निवडी संदर्भात जबाबदारी सोपवल्याबद्दल आमदार रईस शेख यांनी समाजवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांचे आभार मानले आहेत.
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत धर्मनिरपेक्ष आघाडीचा महापौर बसवणे हे आमच्या ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’चे उद्दिष्ट आहे. धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशक विकास यासाठी आमची फ्रंट कटिबद्ध आहे. भिवंडीकरांनी ऐतिहासिक कौल दिला आहे. भिवंडीकरांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी फ्रंट कायम प्रयत्नशील असेल असं भिवंडी सेक्युलर फ्रंट संयोजक आणि सपा आमदार रईस शेख म्हणाले.
