बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
Akash Waghmode : सोलो ट्रेकर आकाश वाघमोडे हा इर्षालवाडी परिसरात ट्रेकसाठी गेला होता. ट्रेकिंग करत असताना पाय घसरून दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

आजच्या तरुणांना सोलो ट्रेकिंगची खूप आवड आहे, अनेकजण राज्यातील विविध भागात सोलो ट्रेकिंगसाठी जातात. मात्र भिवंडीतील एका ट्रेकरच्या रायगड मध्ये मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोलो ट्रेकर आकाश वाघमोडे हा इर्षालवाडी परिसरात ट्रेकसाठी गेला होता. ट्रेकिंग करत असताना पाय घसरून दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरावर शोककळा पसरली आहे. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोलो ट्रेकर आकाश वाघमोडेचा दुर्दैवी मृत्यू
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्षालवाडी परिसरात ट्रेकसाठी गेलेल्या भिवंडी येथील सोलो ट्रेकर आकाश वाघमोडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तडाली गावचा रहिवासी असलेला आकाश राजेंद्र वाघमोडे रविवारी सकाळी आपली दुचाकी डोंगराच्या पायथ्याशी उभी करून इर्षालगडाच्या दिशेने ट्रेकसाठी निघाला होता. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्याने इर्षालवाडी येथे पोहोचल्याची माहिती कुटुंबीयांना फोनद्वारे दिली होती. मात्र त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटला. त्यानंतर त्यांनी वारंवार त्याच्याशी प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
मोबाईलच्या लोकेशनच्या मदतीने शोध
सोमवारी सकाळपासून कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खालापूर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत स्थानिक नागरिक आणि हेल्प फाउंडेशनच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. चार पथकांच्या साहाय्याने इर्षालवाडी परिसरात शोध घेत असताना आकाशचा मोबाईल सुरू असल्याने त्याचा लोकेशनच्या आधारे शोध घेण्यात आला.
300 फूट दरीत कोसळल्याने मृत्यू
दुपारच्या कडक उन्हात शोधमोहीम सुरू असतानाच शोध घेणाऱ्या पथकातील एका सदस्याला आकाशची सेल्फी स्टिक आढळली. त्यावरून अधिक शोध घेतला असता, आकाश इर्षालगडावरून पाय घसरून सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या बचाव पथकाकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून, रात्री उशिरापर्यंत मृतदेह डोंगराच्या पायथ्याशी जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
