रेल्वे प्रवासात काहीही खाण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, भुसावळ स्टेशनवरील व्हिडीओने उडवली झोप, थेट जमिनीवर पडलेले…

| Updated on: Jun 12, 2026 | 9:07 AM

भुसावळ रेल्वे स्थानकावर जमिनीवर पडलेले वडे पुन्हा विकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. वाणिज्य विभाग आणि RPF च्या विशेष मोहिमेत ३०५ अनधिकृत विक्रेते आढळले असून ६७ जणांकडून ९७,९५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार भुसावळ रेल्वे स्थानकावर उघडकीस आला आहे. भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाली पडलेले वडे पुन्हा उचलून तेच वडे प्रवाशांना विकले जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. आता या प्रकरणाची गंभीर दखल भुसावळ रेल्वे प्रशासनने घेतली आहे. सध्या भुसावळ रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात थेट युद्धपातळीवर विशेष मोहीम हाती घेतली आहे. या धडक मोहिमेदरम्यान रेल्वे प्रशासनाने तब्बल ३०५ अनधिकृत विक्रेते शोधून काढले असून, त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

सोशल मीडियावरील व्हिडीओने खळबळ

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भुसावळ रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये प्लॅटफॉर्मच्या अस्वच्छ जमिनीवर पडलेले वडे कोणतीही भीती न बाळगता पुन्हा ट्रेमध्ये भरून प्रवाशांना विकण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट दिसत होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वेच्या खाद्यपदार्थांच्या दर्जावर आणि प्रवाशांच्या आरोग्यावरील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यानंतर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश देत अनधिकृत आणि अवैध विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी विशेष पथके तैनात केली.

२८ मे ते १० जून दरम्यान संयुक्त कारवाईचा धडाका

रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांमार्फतच खाद्यपदार्थ व पेयसेवा दिली जावी, असा नियम आहे. मात्र, अधिक नफा कमावण्यासाठी अनेक अनधिकृत विक्रेते रेल्वे परिसरात सक्रिय असतात. या पार्श्वभूमीवर रेल्वेचा वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी संयुक्तपणे २८ मे ते १० जून या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत भुसावळ रेल्वे विभागातील भुसावळ – खंडवा मार्ग, भुसावळ – नाशिक मार्ग, भुसावळ – बडनेरा मार्ग य मुख्य मार्गांवर आणि स्थानकांवर व्यापक सर्च ऑपरेशन चालवले होते.

६७ जणांवर गुन्हा दाखल; सुमारे १ लाख रुपयांचा दंड वसूल

या पंधरवड्यामध्ये चाललेल्या विशेष मोहिमेत रेल्वेच्या पथकांनी गाड्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर अचानक छापे टाकले. यामध्ये एकूण ३०५ अनधिकृत विक्रेते अवैधपणे खाद्यपदार्थांची विक्री करताना रंगेहाथ पकडले गेले. यातील ६७ विक्रेत्यांवर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईतून प्रशासनाने एकूण ९७,९५० रुपये इतका दंड वसूल केला. तर उर्वरित विक्रेत्यांना रेल्वे परिसरातून हाकलून लावत कडक इशारा देण्यात आला आहे.

प्रवाशांनो, सतर्क राहा! रेल्वे प्रशासनाचे आवाहन

याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, आरोग्याच्या सुरक्षेसाठी कोणत्याही अनधिकृत किंवा विना-परवाना विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ अथवा पाण्याच्या बाटल्या खरेदी करू नका. प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांच्या दर्जेदारपणाबाबत कोणतीही शंका आल्यास किंवा असा अस्वच्छ प्रकार आढळल्यास १३९ या हेल्पलाईन नंबरवर आणि रेलमदद (RailMadad) ॲपवर तक्रार नोंदवू शकता.

Published on: Jun 12, 2026 9:07 AM
Follow Us