दिल्लीला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात मोठा गेम, सर्वात मोठी बातमी समोर
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वार जोरदार वाहत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. यातून नाराजीनाट्य देखील सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या दोन डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. दरम्यान अद्याप निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकींबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये, मात्र राज्यातील नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुका संपल्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इतर पक्षांतून जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, या इनकमिंगचा सर्वात मोठा फटका हा भाजपचेच मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमधील नाराजी उफाळून आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं पहायला मिळालं. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजपसंदर्भात वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. दरम्यान दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून युतीमध्ये सर्व अलबेल असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु आता शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बदलापुरात शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. या सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
