
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात रिकाम्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. पुणे – स्वारगेट या वर्दळीच्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या ‘शिवशाही’ बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. या ‘शिवशाही’ बसेस तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून महामंडळात आणल्या होत्या. साध्या तिकीट दरात सर्वसामान्यांना वातानुकूलित प्रवास घडविण्यासाठी या ‘शिवशाही’ बसेसची निर्मिती झाली होती. ‘शिवनेरी’ प्रमाणे शिवशाहीच्या बहुतांशी बसेस कंत्राटी तत्वावर ‘विनावाहक’ चालविण्यात येत असतात. त्यामुळे एसटी चालकाने ही बस स्वारगेटला पार्क केल्यानंतर तिला लॉक केले नसल्याने आरोपीने कंडक्टर असल्याचा बनाव करुन या तरुणीला बसमध्ये नेत फसविल्याचे म्हटले जात आहे.
एसटी महामंडळाच्या सोलापूर आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0319 ही बस सोलापूर ते स्वारगेट पुणे या मार्गावर धावत होती, ही बस सोलापूर ते स्वारगेट पुणे ( विना वाहक ) होती. या बसचा चालक शंकर लालू चव्हाण यांनी काल रात्री 3.40 वाजताच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात आणली. चालकाने ही बस स्वारगेट बस स्थानकात रसवंतीगृह समोर लावली होती. सकाळी अंदाजे 06:00 वाजताच्या दरम्यान एका इसमाने बसचा वाहक असल्याचे भासवून एका महिला प्रवाशाला या बसमध्ये गेले आणि तिच्यावर अत्याचार केले. या महिला प्रवाशाच्या जबाबानंतर आता संशयित आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.
पुण्यातील स्वारगेट येथे शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दत्तात्रय गाडे असे आहे. दत्ता गाडे हा पुण्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दत्ता गाडे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर आणि शिरुर पोलिसांत गुन्ह्यांची नोंद आहे.त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या शिरुर येथील घरावर देखील पोलिसांनी छापा टाकला आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी आणि हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देखील त्याचा शोध घेत आहेत.