Pankaja Munde : फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक केलं म्हणून होणाऱ्या ट्रोलिंगला पंकजा मुंडे यांचं रोखठोक उत्तर
Pankaja Munde : मुंबई महापालिकेने दिया मिर्झाचा दिवाळी जनजागृती करणारा व्हिडिओ हटवला. त्यावर विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, "बीएमसी वर मी काय उत्तर देऊ. मला विषयच माहित नाही. मी राज्याची मंत्री आहे"

“मी राजकारणात 22 वर्षापासून सक्रीय आहे. मी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते. ग्रामीण महिलांना न्याय मिळावा यासाठी, त्यांच्या कामाला ओळख मिळावी यासाठी बॉम्बे टाइम्स फॅशन वीक फार मोठी गोष्ट आहे. जालन्यातील महिलांचा स्टॉल लागणं, तिथे वेगवेगळे सेलिब्रिटी येऊन त्या साड्या पाहत होते. फार मोठी गोष्ट आहे ही” असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी फॅशन शो मध्ये रॅम्पवॉक केलं. त्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. त्याला पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. “मी त्यांच्यासाठी रॅम्पवॉक केला. मला काही हौस नाही. या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता समजत नाही. त्या महिलांसाठी मला परत जाऊन रॅम्पवॉक करावं लागलं तर मी परत जाऊन करेन” असं पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं. “माझ्या जालन्यातील महिलेची साडी मुंबईतील एक महिला विकत घेत असेल तर तो पैसा माझ्या जालन्यातील महिलेला मिळणार आहे” असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली, पार्थ पवारांची तक्रार केली. या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “हे त्या सूत्रांना विचारा तुम्ही. तेच बोलू शकतील. ज्या दोन जणांची भेट झाली ते बोलू शकतील. मी यावर बोलणं उचित नाही”
‘जालनाई’ नावाचा ब्रँड लॉन्च केलेला
“मी जालन्याची पालक मंत्री बनले. राज्यात जालना सिल्कमध्ये नंबर एक जिल्हा आहे, बीड दोन नंबरवर आहे. दोघांमध्ये स्पर्धा सुरु असते. मुख्यमंत्री जालन्यामध्ये आलेले तेव्हा मी ‘जालनाई’ नावाचा ब्रँड लॉन्च केलेला. जालन्यातील महिलांना रोजगार मिळावा, तिथल्या लूम्सला ताकद मिळावी यासाठी सरकारी विभागाशी ट्रेनिंग करुन एक सुंदर वस्त्र बनवलं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
जालन्याचा स्टॉल मुंबईच्या फॅशनवीकमध्ये लागणं ही मोठी बाब
“त्याचं मार्केटिंग करण्याची रणनिती ठरलेली. त्याच अंतर्गत बॉम्बे टाइम्स फॅशन वीकने मला निमंत्रित केलं. मी जाऊन रॅम्पवॉक केलं. हे रॅम्पवॉक वेगवेगळ्या इंडस्ट्रीजच्या सीईओंनी केलय. पर्यावरणपूरक काम झालं पाहिजे. पर्यावरण मंत्री म्हणून मला बोलावलेलं. जालन्याला मंच मिळावा म्हणून मी आग्रह केला. जालन्याचा स्टॉल लागला. सगळे सेलिब्रिटूी येऊन जालन्याच्या स्टॉलला भेट देत होते. जालना सिल्क काय आहे ते समजून घेतलं. जालन्याचा स्टॉल मुंबईच्या फॅशनवीकमध्ये लागणं ही मोठी बाब आहे. त्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
