Navnath Ban: तुमचा तर बचत गट झालाय… राऊतांचा तो आरोप जिव्हारी, नवनाथ बन यांनी तोफच बाहेर काढली
Navnath Ban on Sanjay Raut: शिवसेना शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी हे काही पक्ष नाहीत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Navnath Ban on Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीतील सावळ्या गोंधळावर आज पत्रकार परिषदेतून तोंडसुख घेतले. शिवसेना शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी हे काही पक्ष नाहीत, लवकरच अमित शाह भविष्यात ते पक्ष नष्ट करणार असा आरोप केला होता. त्याला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. हिंदुत्व सोडले आणि काँग्रेसचे विचार आत्मसात केले हा तुमचा स्वाभिमान आहे का? महाराष्ट्रातील मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचे काम अडीच वर्षात तुम्ही केलं. पत्राचाळीमध्ये मराठी माणसाची घरं लुटली. कार्टुन फॉरवर्ड केलं म्हणून डोळा फोडला हा तुमचा स्वाभिमान आहे का? तुमच्या काळात पत्रकाराने बातमी दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती. विरोधकांची घरं तोडण्यापर्यंत तुमची मजल गेली होती, असा आरोप बन यांनी केला.
2019 मध्ये जेव्हा युती धर्म तोडला आणि तुम्ही काँग्रेसच्या दावणीला पक्ष नेऊन बांधला. तेव्हाच तुमचा स्वाभिमान गहाण पडला आहे. त्यामुळे आता स्वाभिमानाच्या गप्पा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आता करू नये अशी टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.
पक्षही नाही, गटही नाही, तुमचा बचत गट उरलाय
बाळासाहेबांनी सांगितलं होत की माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही. तसं झालं तर मी माझं दुकान बंद करेल. पण तुम्ही त्याच पक्षाला काँग्रेसच्या चरणावर अर्पण केला आहे. सत्तेसाठी हिंदुत्व सोडणं आणि काँग्रेससोबत जाणं, राहुल गांधी यांची गुलामी करणं, बाळासाहेबांचे विचार सोडणं, मुख्यमंत्री पदासाठी संकेत मोडणं याला लाचारी म्हणतात. हे पाप संजय राऊत यांनी केलं आहे, असा आरोप बन यांनी केला. अमित शाह, मोदी हे काय आहेत हे सांगण्यापेक्षा तुम्ही राहुल गांधी यांची गुलामी करता. पक्ष राहुल गांधी यांच्या दावणीला बांधला आहे. मुळात तुमचा पक्ष नाही, गटही नाही. तुमचा बचत गट उरला आहे. बचत गटाचा अध्यक्ष हा तुम्ही राहुल गांधी यांच्याकडे सोडला आहे. राऊत हे येत्या काळात या उबाठा गटाचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये होणार आहे. त्याची सुपारी राऊत यांनी घेतल्याचा आरोप बन यांनी केला.
राऊतांचा आरोप काय?
सुनेत्रा पवार, शिंदेंचा गट ते पक्ष नाहीत. ते अमित शाहांच्या चरणाशीच ते जाणार. लवकरच अमित शाह भविष्यात ते पक्ष नष्ट करणार. शरद पवारांनी हा पक्ष स्थापन केला एका मराठी माणसाने बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि अमित शाहांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं थडगं केलं. बाळासाहेब, पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचं नाव जबरदस्तीने तुम्हाला देण्यात आला. तुमच्याकडे पाय नाही तुमच्याकडे फक्त गुडघे आहेत. हे पक्ष सांभाळण्याची तुमची कुवत नाही अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर हा पक्ष अनाथ झालाय. अजितदादांच्या नावाने काहीकाळ पक्ष चालला आता हे सगळे अनाथ आहे , भविष्यात भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय यांना पर्याय राहिलेला नाही, असा आरोप नवनाथ बन यांनी केला होता.
